वाहने अडवून रस्त्यावर लुटमार करणारी टोळी पकडली !

अकोले पोलिसांची कामगिरी ; सर्व आरोपी संगमनेरचे

प्रतिनिधी —

मोटार सायकल वर इतर वाहने अडवून रस्त्यावर लुटमार, चोऱ्या करणाऱ्या टोळीला अकोले पोलिसांनी नागरिकांच्या साहाय्याने मुथाळणे गावाच्या परिसरातील डोंगरात पकडले असून या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. परिसरातील व गावातील ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.

अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते, लखन डेरा सिंग माचरेकर, प्रेम विजय वाल्हेकर, प्रशांत मंगलदास गिऱ्हे (सर्व रा. घुलेवाडी, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.

या घटनेतील फिर्यादी हे १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समशेरपुर येथून ठाणगाव कडे जात असताना चिंचखांड परिसरात चार अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार यांना गाडी अडवून, खाली खेचून, मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेऊन मोटरसायकलवर पळून गेले होते.

यासंदर्भात अकोले पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त होताच तपास पथक तात्काळ रवाना झाले. समशेरपुरचे बिट अंमलदार हे क्षेत्र हद्दीत तपासात असताना त्यांना माहिती मिळतात अज्ञात इसमांचा शोध सुरू झाला.

गावातील लोकांना फोनद्वारे माहिती देऊन चार अज्ञात इसमांचा शोध सुरू केल्यानंतर हे आरोपी मुथाळणे गावाच्या परिसरात डोंगरात लपलेले असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन आणि येथील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत बराच वेळ पोलिसांना झुंजवले मात्र पोलिसांनी अशाही परिस्थितीत तीन आरोपींना पकडले.

यातील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र पुन्हा या चौथ्या आरोपीलाही पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यानंतर या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयांना न्यायालयाने त्यांना २२ फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. सदर आरोपींकडून पोलिसांनी २ लाख ३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई करण्यासाठी अकोले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे, पोलीस नाईक अजित घुले, रवींद्र व, पोलीस कॉन्स्टेबल दीपक बडे, पोलीस नाईक विठ्ठल शेरमाळे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे, सुयोग भारती, आनंद मैड, आत्माराम पवार, संदीप भोसले, सोमनाथ पटेकर, गोविंद मोरे यांनी तपासात सहभाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!