लुटमार करणारे संगमनेरमधील चोरटे गजाआड !
चोरलेले सोने साकुर मधील एका सोसायटी तारण…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध दांपत्याला लुटून लाखो रुपये आणि दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व चोरटे संगमनेर तालुक्यातील आहेत. चोरट्यांनी लुटलेले सोने संगमनेर तालुक्यातील साकुर गावातील एका सोसायटीमध्ये तारण ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे व धामणी येथे ज्येष्ठ दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनी संगमनेर तालुक्यातून अटक केली आहे. यातील तिघांना मंचर व पारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पुणे स्थानिक गुन्हे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

आकाश फड, रवींद्र भाऊसाहेब फड (वय ३०, दोघे रा. दरेवाडी, ता. संगमनेर, जि. नगर), वैभव दिगंबर नागरे (वय २०, रा. दरेवाडी, ता. संगमनेर, जि. नगर), अतिष बाळासाहेब बडवे (वय २३, रा.पिंपरी लौकी, ता. संगमनेर, जि. नगर) नंदकुमार पवार (वय २१, रा.दरेवाडी, ता. संगमनेर, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थोरांदळे येथे ८ फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवत ३ लाख ५१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. तसेच, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणी येथे १६ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे ज्येष्ठ दाम्पत्याला हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

याप्रकरणी मंचर, पारगाव पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती.

पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी या तपासासाठी सहायक पोलीस निरिक्षक महादेव शेलार, कॉन्स्टेबल साबळे, राजू मोमीन, एनपीसी वारे, अक्षय नवले, सुपेकर, वीरकर असे पथक तयार केले होते. या पथकाने दरेवाडी भागात सापळा लावून आकाश फड याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रवींद्र फड, वैभव नागरे, अतिष बडवे आणि नंदकुमार पवार यांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली.

चोरीचे दागिने हे संगमनेर तालुक्यातील साकुर येथील साई आदर्श को-ऑप. सोसायटीमध्ये तारण ठेवल्याचे त्याने सांगितले आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर व पारगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे तपास करत आहेत.

