श्रीक्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान विकासासाठी दोन कोटी रुपये — पालकमंत्री विखे पाटील
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील खंडोबा देवस्थानच्या परीसर विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

प्रतिजेजूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव माघी पोर्णीमेला सुरू झाला. यात्रेच्या पहील्याच दिवशी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते श्री.खंडोबाची महाआरती करण्यात आली. देवस्थानच्या वतीने स्मृतिचिन्ह देवून विखे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मदाय आयुक्त उषा पाटील, संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष सगाजी पावसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष ॲड.श्रीराम गणपुले, गुलाब सांगळे, काशिनाथ पावसे, भिमराज चत्तर, जावेद जहागिरदार, अमोल खताळ, सोमनाथ दवंगे, किशोर दवंगे, किशोर नावंदर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले की, या गावाला अध्यात्मिक महत्व असल्याने दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतू या तिर्थक्षेत्राची महती अधिक वाढवायची असेल तर यापरीसरातील विकसाला गती द्यावी लागेल. त्यामुळे या देवस्थानचा ब वर्गामध्ये समावेश करण्याची ग्वाही देवून तिर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य महामार्गापासून देवस्थानकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देताना या मार्गावरील पुलाच्या कामाला निधी देण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.

यात्रेच्या निमित्ताने हिवरगाव पावसा येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या पशू पक्षी आणि जनावारांच्या प्रदर्शनाची उद्घाटन विखे पाटील यांनी भेट देवून पाहाणी केली. पशुपालकांशी संवाद साधत त्यांनी माहीती जाणून घेतली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

