राज्‍यात लवकरच गोसेवा आयोगाची स्‍थापना — पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील

प्रतिनिधी —

गो मातेच्‍या संरक्षण आणि संवर्धन चळवळीला बळकटी देण्‍यासाठी केंद्र सरकारच्‍या धर्तीवर राज्‍यातही गोसेवा आयोगाची स्‍थापना करण्‍यासाठी सरकार सकारात्‍मक असून, लवकरच या बाबतीतील निर्णय घेणार असल्‍याची माहीती पशुसंवर्धन आणि दूग्‍धविकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

गो विज्ञान संशोधन संस्‍था पुणे, दादरा नगर हवेली मुक्‍ती संग्राम समिती आणि गो सेवा समिती अहमदनगर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मोरोपंत पिंगळे गो सेवा पुरस्‍कार २०२३ चे वितरण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. राष्‍ट्रीय स्‍वंयसेवक संघाचे पश्चिम विभागाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, भारतीय किसान संघाचे दादा लाड, गो विज्ञान संशोधन संस्‍थेचे राजेंद्र लुंकड, दादरा नगर हवेली मुक्‍ती संग्राम समितीचे अध्‍यक्ष बाळासाहेब जांभूळकर, गो सेवा समिती महाराष्‍ट्र प्रांताचे संयोजक चंद्रशेख धर्माधिकारी , नगरचे संयोजक डॉ.सुनिल कराड आदी याप्रसंगी उपस्थित होते.

यंदाचा राष्‍ट्रीय स्‍तरावरील पुरस्‍कार पुण्‍याच्‍या सुयश चारिटेबल ट्रस्‍ट, व्दितीय पुरस्‍कार कर्नाटक राज्‍यातील वैद्य अजित रावळ आणि तृतीय पुरस्‍कार नगर जिल्‍ह्यातील बेलवंडी येथील दिपक नरवडे यांना प्रदान करण्‍यात आला. सेंद्रीय शेती पंचद्रव्‍य चिकित्‍सा, संवर्धन, संशोधन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिल्‍ह्यातील गौतम कराळे, सावित्रा कोतकर, गजानन डफळ, ह.भ.प हरि धारगे, ह.भ.प दिपक काळे, माणिक देशपांडे, वैद्य औंकार मुळे आणि रमणीकभाई पटेल यांना पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

विखे पाटील यांनी गोमाता संवर्धन आणि संरक्षण चळवळीत योगदान देणा-या सर्व पुरस्‍कार प्राप्‍त संस्‍था आणि व्‍यक्तिंचे अभिनंदन करुन, या संस्‍था आणि व्‍यक्‍ती करीत असलेल्‍या कार्यातून प्रेरणा मिळत आहे. कारण मोरोपंत पिंगळे यांनी ज्‍या विचाराने सुरु केलेली चळवळ लोकाभिमुख ठरत आहे. गोमातेकडे वैज्ञानीक दृष्‍टीकोनातून पाहण्‍याचा त्‍यांनी दिलेला मुलमंत्र या चळवळीचे वैचारिक अधिष्‍ठान ठरले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

भारतीय संस्‍कृती आणि परंपरेत गो मातेचे असलेले महत्‍व आता सेंद्रीय शेतीच्‍या दृष्‍टीने सुध्‍दा खुप महत्‍वपूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रीय शेतीच्‍या चळवळीला पाठबळ देण्‍याची भूमिका घेतली आहे. राज्‍यातही सेंद्रीय शेतीचा प्रसार आणि प्रचार करण्‍यासाठी सरकारने प्रयत्‍न सुरु केले असून, सेंद्रीय शेतीच्‍या माध्‍यमातूनच गो मातेच्‍या संरक्षणाची आणि संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल असा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

या चळवळीमध्‍ये समाजातील प्रत्‍येक घटकाचे योगदान आवश्‍यक आहे. राज्‍य सरकार या चळवळीला अधिक पुढे घेवून जाण्‍यासाठी निश्चित प्रयत्‍न करेल असे सांगून, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, केंद्र सरकारच्‍या धर्तीवरच राज्‍यातही गो सेवा आयोगाची स्‍थापना करण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु झाले आहेत. यासाठी संबधितां समवेत बैठकाही झाल्‍या असून, लवकरच याबाबतीत सरकार निर्णय घेईल अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली. याप्रसंगी संघचालक नानासाहेब जाधव, दादा लाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!