शेतकऱ्यांना कनेक्शन कट न करता पूर्ण दाबाने दिवसा विज द्या — आमदार थोरात 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क

राज्यातील संपूर्ण शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. अशा कठीण परिस्थितीतही तो पीक घेण्याचे धाडस करतो आहे. मात्र रात्री – अपरात्री व अपूर्ण दाबाने मिळणारी वीज यामुळे शेतकरी मोठा संकटात असून सरकारने कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट न करता दिवसभर पूर्ण दाबाने वीज द्यावी अशी मागणी माजी कृषीमंत्री व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्षवेधी करताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. कापूस, सोयाबीन, भाजीपाला सह कांदा पिकाचे भाव कोसळलेले आहेत. मोठ्या कष्टातून शेतकरी शेती पिकवतो आणि शेतीला भाव नसल्याने त्याची कवडीमोल किंमत होते.

मागील दोन वर्षापासून राज्यात बरा पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत असूनही मोठ्या कष्टातून पिके काढतो आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. अशावेळी वीज विभागाच्या वतीने देण्यात येणारी वीज ही अत्यंत कमी दाबाने कमी व रात्रीच्या वेळी दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होते.

याचबरोबर सह्याद्रीच्या पायथ्याला रात्री अपरात्री बिबट्यांचा मोठा संचार असून शेतीला पाणी द्यायचे असेल तर मोठी भीती असते. त्यामुळे सरकारने दिवसभर वीज पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना दिली पाहिजे. याचबरोबर अशा कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा देताना कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये अशी आग्रही मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, कांदा पिकाला पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान, आदिवासी शाळांना शंभर टक्के अनुदान, यांसह विविध प्रश्नांवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाला घेरले आहे.

दिवसभर पूर्ण दाबाने विज द्यावी व कुणाचीही वीज कनेक्शन कट करू नये या आमदार थोरात यांच्या मागणीमुळे राज्यातील तमाम शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!