हिरालाल पगडाल यांच्या ‘इलेक्शन बिलेक्शन’ पुस्तकाला शब्दगंध साहित्य पुरस्कार !
जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, धगधगते तळघळ, रानजुई, नवरत्न, वळण वाटा या पुस्तकांना मिळाले पुरस्कार
प्रतिनिधी —
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिले जाणारे २०२१ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारार्थीमध्ये संगमनेरमधील लेखक हिरालाल पगडाल यांच्या ‘इलेक्शन बिलेक्शन’ या पुस्तकाचा देखील समावेश आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात संगमनेरचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.

इलेक्शन बिलेक्शन, जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, धगधगते तळघळ, रानजुई, नवरत्न, वळण वाटा या पुस्तकांचा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारात समावेश आहे. पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची घोषणा शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केली.

पुरोगामी विचारांच्या आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेल्या शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने लेखक, कवी यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले जात असते. कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्र, कथा-काव्य लेखन, विविध पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बाल संस्कार शिबिर आदींचा यात समावेश असतो. याशिवाय वर्षातून एकदा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.

शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये सुनील गोसावी यांनी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार निवड समितीमध्ये कवयित्री शर्मिला गोसावी, सुभाष सोनवणे, प्रा. डॉ. अशोक कानडे, राजेंद्र फड, बबनराव गिरी, अजयकुमार पवार, किशोर डोंगरे, भारत गाडेकर यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.

२०२१ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘इलेक्शन बिलेक्शन’ हिरालाल पगडाल, संगमनेर (संकीर्ण), ‘जगण विकणाऱ्या माणसांच्या कविता’ हबीब भंडारे, औरंगाबाद, ‘धगधगते तळघर’ उषा हिंगोणेकर जळगाव, ‘रानजुई’ डॉ. बी. जी. शेखर पाटील, ‘वळण वाटा’ प्रा. विश्वनाथ जाधव, आटपाडी, ‘नव रत्न’ उत्तम बोडखे, आष्टी, ‘दलित कवितेची निर्मिती प्रक्रिया’ डॉ. कैलास वानखडे, अकोले, ‘मित्रांची गोष्ट’ किरण भावसार, नाशिक, ‘किलबिल’ भारती सावंत.

