‘थर्टी फर्स्ट’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ साठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी !

प्रतिनिधी —
मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नगर जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ असणाऱ्या भंडारदरा आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पर्यटक नागरिक आणि हौशी मंडळींनी मोठी गर्दी केली आहे.

‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची आणि उत्साही नागरिकांची नेहमीच गर्दी होत असते. दोन वर्षाच्या करोना लॉक डाऊनच्या काळात या ठिकाणी कुठलाच उत्सव झाला नव्हता. यावर्षी मात्र थर्टी फर्स्ट चा उत्सव मोठ्या दिमाखात आणि आनंदात साजरा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

‘हॅपी न्यू इयर साठी’ आज सकाळपासूनच भंडारदरा परिसराकडे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक नगर, इगतपुरी कडून येणाऱ्या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ चालू होती. मुंबई, पुणे नाशिक, नगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहकुटुंब सहपरिवार मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा परिसरात जमले आहेत.

भंडारदरातील व्यवसायिकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सर्व ठिकाणी हॉटेल, ढाबे, टेन्ट हाऊस या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच संगीताचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे. चहापाणी, नाश्ता बरोबरच चमचमीत लज्जतदार शाकाहारी मांसाहारी जेवणाची रेलचेल असणार आहे.

भंडारदरा धरणाच्या बॅक वाटरला असणाऱ्या रिंग रोडवर वाहनांची वर्दळ आहे. तपासणी नाक्यावर वनविभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपासणी होत आहे. टेन्ट हाऊस रेस्टॉरंट असणाऱ्या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल आहे.
यावर्षी वनविभाग आणि पोलिसांनी थर्टी फर्स्ट साजरा करताना विविध नियमांचे पालन करावे असे आवाहन केलेले आहे. त्या दृष्टीने आज हा सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्सव रात्रभर सुरू राहणार आहे.

