साकुर मधील गुंडागर्दी ही आमदार थोरात यांच्या सुसंस्कृत राजकारणाची देणगी ?

 

 

संगमनेर तालुक्यात गुंडगिरीचे राजकारण नाही असे म्हटले जात असले तरी संगमनेरचा इतिहास सर्वश्रुत आहे. तालुक्यातील सहकारी संस्थांच्या, ग्रामपंचायत व इतर निवडणुकांमध्ये बेदम हाणामाऱ्या, दंगली झालेल्या आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये लाठीकाठी, दगडफेक देखील झालेली आहे. संगमनेरचा तो इतिहास आहे. काही वर्ष शांतता नांदत होती. परंतु यंदाच्या काही ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर थोड्याफार हिंसक घटना घडल्या. त्याची पोलिसात नोंद देखील झाली. निवडणुकांच्या राजकारणाचा परिपाक साकुरच्या ग्रामसभेमध्ये उमटला. ‘सुसंस्कृत राजकारणाला तडा’ गेला आहे. 

 

 

 

विशेष प्रतिनिधी —

 

ग्रामसभेत समाजाच्या आणि गावाच्या विकासाचे, मूलभूत गरजांचे, समस्यांचे प्रश्न मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर अगदी मारून टाकण्याइतपत प्राणघातक हल्ला केला जातो. हा हल्ला नियोजनबद्ध असल्याची शंका व्यक्त केली जाते. आणि त्याच कार्यकर्त्यावर शासकीय कर्मचाऱ्यामार्फत सरकारी कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. हा सर्व कटाचाच भाग असल्याचे दिसत असले तरी माजी महसूल मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मधील सुसंस्कृत राजकारणाची ही देणगी आहे काय ? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता उपस्थित करु लागली आहे.

 

आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे समर्थक नेहमीच संगमनेरचे राजकारण हे संस्कृत आहे. या राजकारणात भेदभाव हाणामाऱ्या, गुंडशाही याला थारा नाही. विकासाचे राजकारण केले जाते अशा भूमिका  व्यक्त करत असतात. या भूमिकांना छेद देणाऱ्या किरकोळ घटना संगमनेर तालुक्यात घडत होत्या. मात्र साकुर येथे घडलेली घटना ही किरकोळ स्वरूपातील नसून आमदार थोरात यांच्या सुसंस्कृत राजकारणाची ही भयानक दुसरी बाजू असावी काय ? आणि ती या घटनेतून उघड झाली आहे काय ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

 

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकुर येथील ग्रामसभेच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी पाणीपुरवठ्याबरोबरच विविध प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी याचा राग ग्रामपंचायतच्या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या समर्थकांना आला. त्याचवेळी तेथील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी इघे यांना दमबाजी केली. धमक्या दिल्या. प्रश्न विचारण्यास विरोध केला.

 

आमदार थोरात यांचा हिंसेवर विश्वास नाही. त्यांचा हिंसेला विरोध आहे. अशी त्यांची नेहमीच भूमिका असते. असे असले तरी कार्यकर्त्यांचे मात्र तसे असू शकत नाही. आणि तसे नाही हे साकुरच्या घटनेने उघड केले आहे. यात कोणाच्या विचारांचा आणि राजकारणाचा पराभव झाला आहे याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.

 

हे सर्व स्थानिक सत्ताधारी अनेक वर्षांपासून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक आहेत. त्यातील काही मंडळी थोरात यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या संस्थांवर पदाधिकारी देखील आहेत. या लोकांनी त्या ठिकाणी केलेली ही दादागिरी कशाचे द्योतक आहे ? याचा खुलासा होणे  गरजेचे आहे.

 

प्रश्न विचारणाऱ्याला प्रश्न का विचारला म्हणून दादागिरी करणे म्हणजे तालुक्यावरील राजकीय वर्चस्वाची ही हुकूमशाही तर नाही ? अशा पद्धतीने जर संगमनेर तालुक्यातील राजकारण होणार असेल तर संगमनेर तालुक्याचे राजकारण सुसंस्कृत आहे काय ? याबाबत पुन्हा एकदा सखोल संशोधन करावे लागणार आहे.

 

संगमनेर तालुक्यातील राजकारण हे सुसंस्कृत असल्याचा देखावा असल्याचे आरोप संगमनेरचे विरोधक करत असतात. मात्र संगमनेरच्या नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवलेला नाही. लहान मोठ्या घटना घडत असल्या तरीही संगमनेरकरांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. अनेक ठिकाणी दादागिरी होते. दमबाजी होते. दबाव येतो आणि दबावाचे राजकारण केले जाते. याकडेही दुर्लक्ष झाले.

 

परंतु साकुर येथे घडलेली घटना ही दुर्लक्ष करण्यासारखी नाही. राज्यकर्त्यांची आणि संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांची ही जबाबदारी आहे की, लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांचे काम लोकशाही पद्धतीने करू द्यायला हवे. प्रश्न विचारणे ही जर चूक असेल आणि या चुकीची एवढी मोठी शिक्षा असेल तर आमदार थोरात यांनीच आपल्या सुसंस्कृत राजकारणाची दिशा कोणत्या मार्गावर चालली आहे हे एकदा तपासायला हवे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!