केळेवाडीत घरफोडी ; २ लाख ३० रुपयांचे दागिने लुटले !
दरोडेखोरी – घरपोडीने संगमनेर तालुका हादरला…
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात दरोडेखोरी – घरफोडी, चोरी या घटनांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. संगमनेर शहर व तालुक्यात असे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांत बऱ्याच ठिकाणी घरफोडी आणि दरोडेखोरी झाल्याने संपूर्ण संगमनेर तालुका हादरला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी, घारगाव, संगमनेर ग्रामीण आणि शहर या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या केळेवाडी येथील सोनबा बाळाजी जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. ही घटना सोमवार ता.१९ डिसेंबर रोजी भरदुपारी घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथे सोनबा जाधव हे राहात आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात चोरट्याने जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाट उघडून कपाटामधील रोख रक्कम पाच हजार, दीड लाख रूपये किंमतीचे मनी मंगळसुत्र,पन्नास हजारांचे लहान मुलांचे कानातील बाळ्या, गळ्यातील पान, लहाण मुलांची अंगठी, पंचवीस हजारांचे चांदीचे कमरेचे छल्ले असा एकूण २ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याप्रकरणी सोनबा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४३६/ २०२२ भादवी कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी बोटा परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक शेतकर्यांच्या विद्युत मोटारीही चोरून नेल्या आहेत त्यामुळे शेतकरीही वैतागले आहेत.त्यातच आता दिवसा ढवळ्या चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

