महसूल मंत्री विखेंच्या धडक कृती कार्यक्रमामुळे संगमनेरातील लाभार्थ्यांचा जळफळाट !
गौण खनिज तस्करी, चोरीतून (स्टोन क्रशर) करोडो रुपयांचा महसूल लाभार्थ्यांनी बुडवला असल्याचे उघड झाले आहे. आणि हे अधिकृत आहे. ही सर्व आकडेवारी महसूल विभागाची नोंदणीकृत आकडेवारी असून त्यातून कोणी किती शासनाचा महसूल बुडवला आहे हे स्पष्ट होत आहे. यात महसूल बुडवणाऱ्यांची नावे देखील उघड झाली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी उगाच आदळ आपट करण्याची गरज नाही. चोरी केली आहे तर गप्प बसावे, दंड भरावा नाही तर त्यांना न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेतच. मात्र विनाकारण चालवलेली आदळ आपट बंद करावी.
विशेष प्रतिनिधी —
उत्तर नगर जिल्ह्यासह संगमनेर शहर आणि तालुक्यातून गौण खनिजांची होणारी तस्करी, वाळू माफियांचे राज्य, यामुळे पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम आणि या तस्कर आणि चोरांची वाढलेली मुजोरी मोडून काढण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धडक कृती कार्यक्रम चालू केला असल्याने संगमनेर मध्ये असलेले तथाकथित लाभार्थी खवळलेले असून त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे. मात्र विखे यांच्या या कृतीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

संगमनेर शहर आणि तालुक्यात प्रवरा, मुळा, म्हाळुंगी आणि आढळा या नद्यांमधून दिवस रात्र वाळू उपसा सुरू असतो. नुसते संगमनेरच नव्हे तर लाभार्थ्यांनी राजकीय फायदा उचलत संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्यात गौण खनिज तस्करीचा धुमाकूळ घातला होता.

ही मुजोरी वाढत चालली होती. वाळू माफिया कोणाचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. पोलीस, महसूल प्रशासन, सगळेजण दबावा खाली काम करत असल्यामुळे अवैध धंद्यांना ऊत आला होता.
या सर्व प्रश्नांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. विधानसभेत देखील हे सर्व प्रश्न चव्हाट्यावर आणले होते.

आता दस्तूर खुद्द राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री झाले असून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील ते आहेत. मंत्रीपद घेतल्यानंतर त्यांनी गौण खनिजाची होणारी तस्करी यामध्ये वाळू, दगड, खडी, माती, मुरूम या सर्व गौण खनिजाच्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी धडक कृती कार्यक्रम सुरू केला.

सर्व अधिकाऱ्यांना कडक आदेश देऊन कारवाई करण्याचे आणि सक्तवसुलीचे आदेश दिले. कोणी ऐकत नसेल तर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मुभादेखील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार सर्वत्र ही कारवाई सुरू झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील सुमारे ५७ खडी स्टोन क्रशर वर कारवाई करण्यात आली आहे. एकट्या संगमनेर तालुक्यात एवढे खडीचे स्टोन क्रशर असल्याचे आढळून आले आहे.

या कारवाई करण्यात आलेल्या आणि बंदी घातलेल्या स्ट्रोन क्रशरचा मालकांपैकी काही लाभार्थी मंडळी, सगे सोयरे, भाऊबंद आणि कार्यकर्ते या गटात मोडणारे आहेत. या सर्वांचे पितळ आता उघडे पडू लागले आहे. त्यामुळे या मंडळींचा जळफळाट सुरू झालेला आहे. या मंडळींनी तहसीलदारांना उपोषण करण्याची नोटीस वजा इशारा देखील दिलेला आहे.

गौण खनिज तस्करी, चोरीतून (स्टोन क्रशर) करोडो रुपयांचा महसूल लाभार्थ्यांनी बुडवला असल्याचे उघड झाले आहे. आणि हे अधिकृत आहे. ही सर्व आकडेवारी महसूल विभागाची नोंदणीकृत आकडेवारी असून त्यातून कोणी किती शासनाचा महसूल बुडवला आहे हे स्पष्ट होत आहे. यात महसूल बुडवणाऱ्यांची नावे देखील उघड झाली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी उगाच आदळ आपट करण्याची गरज नाही. चोरी केली आहे तर गप्प बसावे, दंड भरावा नाही तर त्यांना न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेतच. मात्र विनाकारण चालवलेली आदळ आपट बंद करावी.

लाभार्थ्यांनी नातेवाईकशाहीचा, भाऊबंदकीचा आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या पदाचा केलेला हा दुरुपयोग आता सर्वसामान्य जनतेसमोर उघडा पडला आहे. महसूल मंत्री विखे पाटलांनी हा सर्व प्रकार जनतेसमोर आणल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान ज्या लाभार्थ्यांना दंड किंवा कारवाई करण्यात आलेली आहे त्यातील लाभार्थ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. या उपोषणाला उत्तर देताना तहसीलदारांनी आपल्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे याचे स्पष्टीकरण देत आपणास या कारवाईच्या विरोधात प्रांत अधिकारी किंवा न्यायालयात जाऊन दाद मागण्याची मुभा असल्याचे स्पष्ट कळविले आहे. उपोषण केले तर त्याची जबाबदारी आपल्यावर राहील असेही तहसीलदार यांनी बजावले असून कारवाई मात्र नक्की होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

