मुख्यमंत्र्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा- भाजपा ओबीसी मोर्चाची मागणी

प्रतिनिधी

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आला, त्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
राज्यातील ओबीसी विरोधी महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे व उदासीन भूमिकेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्णत: स्थगित झालेले आहे. राज्यातील गेल्या सहा महिन्यात सात जिल्हा परिषद व १०६ नगरपंचायतीच्या निवडणुका या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवायच घेण्यात आल्या. एकीकडे ५२ टक्केच्या वर असणाऱ्या ओबीसी समाजावर असा अन्याय महाविकास आघाडी सरकार करीत आहे व दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाज हा ब्राह्मणवाद्यांचा पगडा असलेला समाज आहे, ओबीसी समाजाचा संघर्षाचा कोणताही इतिहास नाही त्यामुळे माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही असे वक्तव्य करून समस्त ओबीसींचा अपमान केलेला आहे. एकीकडे ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे दुष्ट काम करायचे व दुसरीकडे वरील प्रमाणे वक्तव्य करून समस्त ओबीसी समाजाला डिवचण्याचे काम करायचे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दिसून येते.
वरील वक्तव्य करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समस्त ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागून घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आली, आव्हाडांचा राजीनामा न घेतल्यास भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत, भाजपाचे शहराध्यक्ष ॲड श्रीराम गणपुले, नगरसेविका मेघा भगत, जिल्हा सचिव शिवकुमार भंगिरे, ओबीसी शहराध्यक्ष संपत गलांडे, तालुकाध्यक्ष ॲड गोरक्ष कापकर, कांचनताई ढोरे, तालुका उपाध्यक्ष कचरु वारुंक्षे, शिवाजी घोडेकर, भारत ढोरे, हरीष वलवे, गोकुळ देशमुख, संतोष पठाडे, विकास गुळवे, कैलास भरीतकर, सुनिल खरे, सिताराम मोहरीकर, संजय नाकिल, किशोर गुप्ता, जावेद जहागिरदार, वैभव लांडगे, दिपेश ताटकर, राहुल भोईर, दिलीप रावल, मनोज जुंदरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!