प्रवरानदी बचाव आंदोलन हे राजकीय असल्याचे संगमनेर ग्रामीण पोलिसांचे मत
प्रवरानदी पात्रालगत असलेल्या गावांना बजावली नोटीस
पोलिसांची भूमिका संशयास्पद
प्रवरा नदीकाठच्या गावांमध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यास मनाई
प्रतिनिधी
अमृतवाहिनी प्रवरा नदी प्रदूषणाबाबत वाद पेटलेला असतानाच आता संगमनेर तालुका पोलिसांनी प्रवरा नदीकाठच्या गावांमध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यास मनाई केली असल्याने संगमनेर पोलिसांची नेमकी भूमिका काय आणि पोलिसच राजकीय दबावाखाली वागत असल्याची चर्चा आता ग्रामीण भागात होऊ लागली आहे.
संगमनेर साखर कारखाना, दूध संघ आणि नगरपरिषद हे दूषित पाणी प्रवरा नदीपात्रात सोडत असल्याने येथील पाण्याचा धोका ग्रामीण भागातील नागरिकांना होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे म्हणत संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी या संदर्भात ठराव करून कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यावरून बरेच वाद चिघळले आणि या वादाचे स्वरूप हाणामाऱ्या पर्यंत गेल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कनोली, जोर्वे, रहिमपूर, कोल्हेवाडी गावांमधून प्रवरा नदी बचाव कृती समितीची स्थापना करण्यात येऊन या प्रदूषणा विरुद्ध आवाज उठविण्यात येत होता.
आंदोलने निवेदने या पातळीवर हा निषेध होत असतानाच काही गावांमध्ये कृती समितीच्या वतीने व परिस्थितीती दर्शक छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. हे फलक काही समाजकंटकांनी फाडून, तोडून टाकले. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी समितीच्या वतीने ग्रामीण पोलिसांकडे करण्यात आली. परंतु त्या तक्रारीकडे पोलिसांनी लक्ष दिले नाही व कुठलीच कारवाई केली नाही. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी संगमनेर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांची भेट घेऊन संपूर्ण चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. हे आंदोलन कोणत्याही प्रकारचे राजकीय स्वरूपाचे नसून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
असे असतानाही आज संगमनेर तालुका पोलिसांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना एक आदेश दिला असून त्यात म्हटले आहे की, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कनोली, जोर्वे, रहिमपूर, कोल्हेवाडी या प्रवरा नदी किनारी वसलेल्या गावांमध्ये काही ग्रामस्थांनी प्रवरा नदी बचाव समिती स्थापन करून गावात विविध ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावले आहेत. सदर फ्लेक्स लावण्याने राजकीय वातावरण तापले असून त्यामुळे काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड फाडण्याचे प्रकार राजकीय वादातून घडले आहेत. यातून मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे. तरी या द्वारे आपण आपले अधिपत्याखालील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व संबंधितांना सुचित करून अशा प्रकारचे सर्व फ्लेक्स तात्काळ काढून घेण्याबाबत आदेश करावेत.
अशा प्रकारचे आदेश देण्यात आल्यामुळे सदर गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर नोटीस या गावांमधील ग्रामपंचायतीमध्ये देण्यात आलेली आहे. पोलिसांची याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही.
पोलिसांची भूमिका राजकीय असल्याचा आरोप
तालुका पोलिसांची भूमिका संशयास्पद असून तालुका पोलिसांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सदर गावांमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्ड मुळे वातावरण तणावाचे झाले आहे. हे फ्लेक्स फाडण्यात आल्यामुळे येथील वातावरण गंभीर आहे. पोलिसांनी हे मान्य केलेले आहे. फ्लेक्स बोर्ड फाडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवरा नदी बचाव कृती समितीची आहे. हे सर्व असताना पोलिस ती कारवाई करायची सोडून सर्व फ्लेक्स बोर्ड काढून टाका असे सूचना का करत आहेत ? हा एक संशयास्पद भाग बनला आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका राजकीय आहे की काय हा संशय निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी मधून होत आहे. पोलिसांच्या भूमिकेविषयी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
