अमरधाम बोगस निविदा प्रकरण 
नगर परिषद कार्यालयात भाजपने वाटले गोड-गोड बुंदीचे लाडू..!!
प्रतिनिधि — 

संगमनेर शहरातील अमरधामच्या  बांधकामासाठी काढण्यात आलेल्या निविदा बोगस असल्याचे आरोप झाल्यानंतर ही निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली होती. भाजपने या निविदा प्रक्रिया संदर्भात प्रतिकात्मक  श्रद्धांजली सभा घेतली होती.

त्यानंतरचे पुढचे आंदोलन म्हणून संगमनेर नगरपरिषदेची प्रामाणिक पारदर्शक निविदा प्रक्रिया मरण पावली, श्रद्धांजली सभा पार पडल्यानंतर आज त्या स्मृतीप्रित्यर्थ नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन अन्नदान करण्यात आले.

संगमनेर नगर परिषदेच्या अमरधाम बोगस निविदा प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत असून आज संगमनेर शहर भाजपच्या वतीने पुन्हा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई काय झाली याबाबत विचारणा करण्यात आली.
अमरधामच्या एकाच कामाच्या तीन वेळा निविदा काढण्यात आल्या. त्यातल्या दोन निविदा या बोगस असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला. हा प्रश्न चांगलाच गाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांच्या विरोधात आरोपांच्या फैरी  झाडल्या. सत्ताधाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आणि विरोधकांनी मात्र हे प्रकरण लावून धरले आहे.
नगरपालिका प्रशासनाशी संपर्क केला असता निविदा प्रक्रिया थांबवली असून सध्या परिस्थिती जैसे थे आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आज भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर व युवा मोर्चा तर्फे संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, संगमनेर नगरपरिषदेची प्रमाणिक पारदर्शक निविदा प्रक्रिया मरण पावली. त्यास प्रतिकात्मक श्रद्धांजली सभा झाली. आज तिचे स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान करत आहोत.
अमरधाम मधील कामांचा अद्याप आपले स्तरावर पंचनामा नाही. आपलेकडे सदर प्रकरणातील निवादांचे इंस्पेक्शन मागितले त्यासही उत्तर नाही. यात प्रशासकीय स्तरावर आपली अकार्यक्षमता कारण आहे की राजकीय दबावाने आपण भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालता हे कळत नाही. पंधरा दिवसातही चौकशी तपास होत नाही. याचा अर्थ जनतेला कळत नाही असे नाही.
या प्रसादाने तरी आपणास स्वच्छ हाताने व मनाने जनतेसमोर वस्तुस्थिती सांगायची सद्बुद्धी मिळो ही सदिच्छा.
दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर नगर परिषदेच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना गोड गोड बुंदीच्या लाडूंची पाकिटे अन्नदान व प्रसाद म्हणून वाटली.
यावेळी  शहर अध्यक्ष ॲड.श्रीराम गणपुले, संजय नाकील, जावेद जहागीरदार, शिरीष मुळे, किशोर गुप्ता, दीपक भगत, श्रीगोपाल पडतानी, सुधीर कुलकर्णी, अमित गुप्तां, कैलास भरीतकर, भारत गवळी, शाम कोळपकर, धीरज मुळे, उत्कर्ष जोशी, सीताराम मोहरिकर, मेघा भगत, गणेश सानप, रोहित चौधरी, दीपेश ताटकर, प्रकाश दिघे, संतोष पठाडे आदी  उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!