इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असलेल्या एका शाळेचे पुनर्निर्माण होत आहे….

अकोले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जीवन शिक्षण मंदिर या शाळेची ही इमारत. अकोले शहर आणि परिसरातील नवलेवाडी, शेकईवाडी, पानसरवाडी आणि माळीझाप परिसरातील अनेकांचं या शाळेशी विलक्षण नातं आहे.

ग म भ न… गिरवायला शिकवताना अक्षरांची ओळख याच शाळेने करवून दिली. आज वयाची चाळीशी, पन्नाशी ओलांडलेले बहुसंख्य अकोलेकर मंडळी याच शाळेच्या अंगाखांद्यावर खेळली, बागडली, शिकली सवरली. लहानची मोठी झाली. आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेल्या आणि त्यामुळेच आज सन्मानाचे जीवन जगत असलेल्या प्रत्येक अकोलेकर व्यक्तीच्या आयुष्यात या शाळेचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. याच शाळेने आणि शिक्षकांनी शेकडो चिमुकल्यांच्या पंखांना गगनभरारी घेण्यासाठी बळ दिले. शाळेशी जोडलेल्या आपल्या अनेकांच्या अनेक चिरस्मरणीय आठवणी आहेत. बालपणातल्या या आठवणींचा सुगंध आजही तनामनात, काळजाच्या कोपऱ्यात दरवळत असतो….
दहा बारा वर्षापूर्वी इथे चिमणी पाखरांची भरपूर किलबिल ऐकू येई. मैदानावर मुलांची केवढी दंगा मस्ती चालायची. अंगाखांद्यावर बागडणारी ही मुलं हेच शाळेचं खरं वैभव होतं. आपल्याला जीवनाचे शिक्षण देणाऱ्या या ज्ञान मंदिराची मधल्या काळात पडझड झाली. या परिसराला विपरीत अवकळा आली. काही अपरिहार्य कारणांनी पंचायत समितीचे कार्यालय शाळेच्या आवारात आले. शिक्षणाचे वातावरण हरवले. एकेक करून मुलं या शाळेतून इतर शाळांत निघून गेली. इथले हसते खेळते, चैतन्य हरपून गेले. सध्या शाळेची पटसंख्या इतकी कमी झाली आहे की ही शाळा बंद पडायची वेळ आली.

सन १८६८मध्ये स्थापन झालेल्या आणि अकोले तालुक्यातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक असलेल्या या शाळेची आज अशी केविलवाणी अवस्था बघून अनेकजण हळहळ व्यक्त करतात. ही दारुण स्थिती बघून अस्वस्थ झालेल्या तालुक्यातील काही प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन या शाळेचे पुनर्निर्माण करायचा दृढनिश्चय केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून साफसफाई करणे, शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी करणे, परिसराचे सुशोभीकरण करणे अशी कामे सुरू आहेत. बाह्यांगाची सजावट झाली की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी काय करायचे याचा आराखडा तयार केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात करण्यासाठी डिजिटल क्लासरूम उभ्या करायच्या आहेत. भरपूर पुस्तकं असलेले उत्तम ग्रंथालय, संगणक शिक्षण देण्यासाठी संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, गणित कक्ष, भाषा कक्ष… असे बरेच काही करायचा मानस आहे. भंडारदरा धरण, कळसूबाई शिखर, रंधा फॉल अशा अकोले तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाणां ची माहिती देणारे प्रदर्शन इथे कायमस्वरूपी असेल असा प्रयत्न आहे. अकोले शहरातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका सुरू करायचा मानस आहे. त्यासाठी इथे जागा उपलब्ध आहे.

सध्याच्या काळात घरात राहून मुलं मोबाइल आणि टिव्ही केंद्रित झाली आहेत. स्क्रीन टाईम वाढला आहे. हे चांगलं लक्षण खचितच नाही. लहान मुलांच्या आयुष्यात कला आणि खेळाचे स्थान वादातीत आहे. या शाळेत लहान मुलांना खेळायला प्रशस्त मैदान आहे. मागील बाजूस खेळण्यांसह देखणे बालोद्यान साकारायची कल्पना पुढे आली आहे. पहिली ते चौथी सेमी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाचे ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. अकोले शहरातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ही शाळा मॉडेल स्कूल बनवण्याचा प्लॅन तयार केला आहे. ही कामे पूर्ण होतील तेव्हा अत्यंत आकर्षक बनलेला कॅम्पस मुलांच्या, पालकांच्या मनाला मोहिनी घालील, असा विश्वास वाटतो.

स्वच्छताविषयक कामे पूर्ण झाली आहेत. रंगरंगोटी सुरू आहे. मात्र या कामासाठी कोणतीही शासकीय योजना नाही. समाजाच्या सहभागातून हे काम आकाराला येत आहे. काही देणगीदार पुढे आले आहेत. अकोलेकरांनी लोकांच्या सहभागातून अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत.
आपण ज्या शाळेत शिकलो ती शाळा बंद पडणे. इतिहासजमा होऊन जाणे ही आपल्यासाठी केवढी भयंकर क्लेशकारक बाब ठरेल. त्या शाळेच्या पुनर्निर्माण करण्यासाठी आपल्या कृतिशील सहभागाची नितांत गरज आहे. आपापल्या परीने आपण या कामासाठी अर्थसाह्य करावे. माजी विद्यार्थ्यांना हे आवाहन आहेच या खेरीज अकोल्यातील व्यापारी, दानशूर व्यक्ती, सेवेत असलेले, निवृत्त झालेले शिक्षक, अधिकारी, डॉक्टर्स… अशा सर्वांना आम्ही ज्ञान मंदिराचे पुनर्निर्माण करण्यासाठी या शिक्षण यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत.

इकडे आर्थिक व्यवहार पारदर्शी ठेवले आहेत. शिक्षक बँकेत दोन मुख्याध्यापकांच्या नावे संयुक्त खाते उघडले आहे. सर्व आर्थिक व्यवहार चेकद्वारे केले जात आहेत. या ज्ञानमंदिराचे पुनर्निर्माण करण्यासाठी आपण आर्थिक हातभार लावावा, अशी कळकळीची विनंती आहे.

( शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर सर यांच्या फेसबुक वॉल वरून….)

अहमदनगर जिल्हा प्राथमिक
शिक्षक सहकारी बँक, शाखा अकोले.
खाते क्रमांक – ४६४१

आपले,
मुख्याध्यापक,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (अकोले मुले)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (अकोले मुली)

संपर्क क्रमांक-
+91 96896 68287
+91 94233 87988
+91 9422855151

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!