डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाद-विवाद स्पर्धेत पहाडे लॉ कॉलेज प्रथम
बहुजन विद्यार्थी संघटना व संगमनेर कॉलेजचा उपक्रम
प्रतिनिधी —
संगमनेर महाविद्यालयात बहुजन विद्यार्थी संघटना व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४२ व्या वाद-विवाद स्पर्धेत सांघिक गटात पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक औरंगाबाद येथील पहाडे विधी महाविद्यालयाने पटकाविले आहे.

समाजात यशस्वी व्यक्तींचा नेहमीच गुणगौरव होत असतो. परंतु जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या अयशस्वी स्पर्धकांचेही तेवढेच मोल महत्त्वाचे असते. स्पर्धेत कोणतातरी संघ पराभूत होतं असतो. म्हणूनच जिंकणाऱ्याचे अस्तित्व सिद्ध होत असते. आयुष्यात कठोर मेहनतीवर विश्वास असणारा संघ यशस्वी होतो. कठोर परिश्रमामुळे ज्ञानाची अभिवृद्धी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासून चांगल्या सवयींची जोपासना करावी, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास सराफ यांनी केले. स्पर्धेच्या पारितोषक वितरणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मंचावर संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाद विवाद स्पर्धेचे समन्वयक डॉ. राहुल हांडे, स्पर्धेचे मुख्य परीक्षक प्रा. पोपट सातपुते, डॉ. गोरक्षनाथ सानप, डॉ.नामदेव साबळे, प्रा.अरुण लेले, डॉ. संगीता जाधव, डॉ. वंदना भवरे आदी उपस्थित होते.

सराफ म्हणाले की, आपला आपल्या श्रमवार विश्वास असला पाहिजे. त्याचबरोबर जीवनात साधना खूप महत्त्वाची असते. पुस्तकाच्या सानिध्यात असणारा माणूस मनाने शुद्ध राहतो. त्याचे अंत:करण शुद्ध होते. विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करायला शिकले पाहिजे. विद्यार्थ्यांनी श्रमाचा जप केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड म्हणाले, वाद-विवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक पारितोषिक मिळविले आहे हे निश्चितच कौतुकस्पद आहे. संगमनेर महाविद्यालय हे गुणवत्तेला प्राधान्य देणारे महाविद्यालय आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या कष्टाला न्याय देण्याचा प्रयत्न परीक्षकांनी निश्चितच केलेला आहे. या स्पर्धेची सुरुवात प्राचार्य म.वि. कौडिण्य यांच्या प्रेरणेतून झाली आहे व तिची वाटचाल अविरतपणे सुरू आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या सर्व विभागांमधून संघ आल्यामुळे स्पर्धा खरोखरच अटीतटीची झाली. स्पर्धेच्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक मंथनाची चिकित्सा या व्यासपीठावर घडली हे विशेष आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

परीक्षकाचे मनोगत व्यक्त करताना प्रा.पोपट सातपुते म्हणाले, नव्या काळातील आभाशी माध्यमांचा वापर विद्यार्थ्यांनी जपून करावा. अलीकडच्या काळात वाचन संस्कृतीवर काही प्रमाणात आक्रमण झाले आहे. नव्या काळात निर्माण होणाऱ्या माध्यमांचा विचार करणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना जीवनात काय चांगले? व काय वाईट? हे सर्व पाहून निर्णय घेता आला पाहिजे.

याप्रसंगी सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक औरंगाबाद येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाने पटकाविले. वादविवाद स्पर्धेत विविध महाविद्यालयातील २४ संघ सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.राहुल हांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. गोरक्षनाथ सानप यांनी मानले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

