दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे, जागे रहा !
उद्धव ठाकरे यांचे तमाम शिवसैनिकांना, शिवसेनाप्रेमींना आवाहन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव गोठवले. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गो. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाणाची मनोभावे पूजा करायचे. आजही तो त्यांच्या देव्हाऱ्यात पूजला जातो. पण चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामाचे पवित्र धनुष्यबाण गोठवले. असा हल्लाबोल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटावर केला. शांत डोक्याने पण आत्मविश्वासाने आपल्याला मोठी लढाई जिंकायची आहे आणि ती जिंकल्यावर आपल्याला आव्हान देणारे कोणीही नसेल. असे सांगतानाच “दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे. अजिबात झोपू नका, जागे रहा !” असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींना केले.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा तसेच ‘शिवसेना’ हे नाव न वापरण्याचा हंगामी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दिला. त्या नंतर आज उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि राज्यातील नागरिकांशी फेसबुक ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी मिंधे गटाचा जोरदार समाचार घेतला.

‘ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी मने पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, तिचा घात करायला निघालात, मराठी माणसाची एकजूट फोडायला निघालात, शिवसेना हे पवित्र नाव गोठवलत. या देशात हिंदू म्हणायची कुणाला हिम्मत नव्हती तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी ती दिली. शिवसेनाप्रमुखांनी दिलेली हिम्मत तुम्ही गोठवली. हिंदुत्व असेच मिळालेले नाही. त्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी अंगावर अनेक धोके संकटे घेतली. शिवसेना या नावाशी तुमचा संबंधच काय ? प्रबोधनकार ठाकरे यांनी जे दिले शिवसेनाप्रमुखांनी ते रुजवले त्याचा तुम्ही घात करताय. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटावर घनाघात केला.

आज अनेक जणांचे मला फोन आले. काहीजण अक्षरशः रडत होते. मी सहा वर्षांचा होतो तेव्हा 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. स्थापनेचा नारळ आमच्या शिवाजी पार्कच्या घरातच वाढवला गेला. त्या नारळातून जे पाण्याचे तुषार उडाले ते मला एवढे चिंब भिजवून टाकतील याची कल्पनाच नव्हती. शिवसेनेचे पक्षप्रमुख पद स्वीकारावे लागले. नंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवले होते आज पण आज शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये मी भिजतोय. ते दुःखाचे नाहीत, उद्वेवेगाचे, रागाचे, चिडीचे आहेत. संकटे येतात आणि जातात पण या संकटांमध्ये संधी दडलेली असते. या संधीचे मी सोने करून दाखवेन.

