संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालणार नाही !
पालकमंत्री विखे पाटील यांचा काँग्रेसला इशारा
प्रतिनिधी —
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो असलेले फ्लेक्सबोर्ड फाडले तरी त्यांची प्रतीमा जनतेच्या मनातून कमी होणार नाही. यापुढे दहशतीचे राजकारण चालणार नाही. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही संघटीतपणे अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी कटीबद्ध व्हावे, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असा दिलासा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तळेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमीत शहा आणि भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले फ्लेक्सबोर्ड तळेगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फाडले होते. त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते रामदास दिघे यांच्या घरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी तळेगाव येथे दिघे कूटूंबियांची भेट घेवून त्यांना धिर दिला. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून दहशतीच्या राजकारणास तुम्ही घाबरू नका, परिस्थिती आता बदलली आहे. संघटीतपणे मुकाबला करा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

मंत्री विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांसमवेतही याच ठिकाणी बैठक घेतली. अतिरिक्त पोलिस अधिक्षक स्वाती भोर, तहसिलदार अमोल निकम यांच्यासह महसूल आणि पोलिस प्रशासन अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्थानिक प्रश्नांबाबत मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या. नागरीकांनी केलेल्या तक्रारीचे गंभीर दखल घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या भेटीपूर्वी भाजपाच्या वतीने फ्लेक्सबोर्ड फाडल्याबद्दल तळेगाव चौकात निषेध सभाही घेण्यात आली. या सभेस भाजपाच्या किसान आघाडीचे प्रमुख सतिष कानवडे, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे, हरीश्चंद्र चकोर, अमोल खताळ, शरद गोर्डे, आदी उपस्थित होते. माजी उपसभापती नामदेव दिघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत तळेगाव आणि पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निर्माण केलेल्या दहशतीचा समाचार घेवून टीका केली. या भागाला वर्षानुवर्षे केवळ आश्वासने देवून झुलवत ठेवले. निळवंडे धरणाचे श्रेय घेणारे भोजापूरच्या पाणी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. केवळ ठेकेदारांच्या जीवावर राजकारण करुन दहशत निर्माण करण्याचा आरोप या जाहीर सभेत करण्यात आला.

