ईद-ए- मिलाद-उन-नबी !

संगमनेर मधील मस्जिद आकर्षक विद्युत रोषणाईने सजल्या !!

विशेष प्रतिनिधी —

आज ईद ए मिलाद-उन-नबी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. संगमनेर शहरात असणाऱ्या सर्व मस्जिद आणि दर्ग्यांमध्ये रंगरंगोटी, सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुस्लिम बांधवांनी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुस्लिम बांधव वर्षभरात साजऱ्या करत असलेल्या सणांपैकी ईद ए मिलाद-उन-नबीला वेगळे आणि विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे इस्लामचा रबी उल अव्वल या तिसऱ्या महिन्यातील १२ व्या दिवशी ईद ए मिलाद-उन-नबी साजरी केली जाते. या दिवशी इस्लाम धर्माचे अखेरचे संदेशवाहक आणि महान संदेष्टे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता, अशी मान्यता असल्यामुळे ही ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ईद ए मिलाद-उन-नबी आज ९ ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे.

रबी उल अव्वलच्या १२ व्या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद ए मिलाद उन नबी नावाने साजरा केला जातो. ‘ईद’ या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. या दिवशी अन्नाच्या स्वरुपात दान केले जाते. इस्लाम धर्मातील मान्यतांनुसार, पैगंबर हजरत मोहम्मद हे अखेरचे संदेशवाहक आणि सर्वांत महान संदेष्टे मानले जातात. पैगंबर हजरत मोहम्मद यांना खुद्द अल्लाहने देवदूत जिब्रईलद्वारा कुराणचा संदेश दिला होता, अशी मान्यता आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. ‘शिया’ आणि ‘सुन्नी’ यांची या समाजात या दिवसाबद्दल स्वत:ची अशी वेगवेगळी मते आहेत, असे म्हटले जाते.

ईद ए मिलाद-उन-नबी या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव मशिदीत नमाज अदा करायला जातात. या दिवसात रात्रभर प्रार्थना सुरू असते. पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतीकात्मक पावलांच्या निशाणावर प्रार्थना केली जाते. या दिवशी मोठमोठ्या मिरवणूकही काढल्या जातात. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी इस्लामचा सर्वांत पवित्र ग्रंथ कुराणाचेही वाचण केले जाते. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिला वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळतो. तसेच या दिवशी मक्का-मदिनाला आवर्जुन मुस्लिम बांधव जातात.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!