विज्ञान आणि अध्यात्म समाज विकासासाठी गरजेचे – डॉ. जयश्री थोरात
प्रतिनिधी —
अध्यात्म हे मनशांती देते. तर विज्ञान हे सत्य शोधते. अध्यात्म आणि विज्ञान हे मानवाच्या विकासासाठीच आहेत. दोन्हीही एकत्र आले तर समृद्ध समाज निर्माण होईल. याचबरोबर तरुणांनी मोबाईलवर व्यस्त न राहता व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे. चांगला आहार आणि व्यायाम हा धावपळीच्या जीवनात प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

देवकौठे येथे जगदंबा मातेच्या महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माऊली ज्ञानेश्वर महाराज कदम, भारत मुंगसे, भागवत आरोटे, डॉ. हसमुख जैन, सुभाष सांगळे, राजेंद्र मुंगसे, राजेंद्र कहांडळ, अनिल गाजरे, नामदेव कहांडळ, पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, एकनाथ मुंगसे, मच्छिंद्र कहांडळ, बाळासाहेब गुडघे, प्रवीण मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, दत्तू मुंगसे, विश्वनाथ आरोटे, नंदू मोकळ, सुरेश मुंगसे, अभिमन्यू मुंगसे आदी उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून सुरू करण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन डॉ. हसमुख जैन व डॉ जयश्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. थोरात म्हणाल्या की, सध्याचे जीवन हे अत्यंत धावपळीची आहे. आणि आशा काळात चांगला आहार आणि व्यायाम हा गरजेचा आहे. मात्र तरुण पिढी ही व्हाट्सअप विद्यापीठाशी जोडली गेली आहे. मोबाईलच्या नादात अनेक व्याधी प्रत्येकाला जडल्या आहेत. त्यापेक्षा व्यायाम करा. मैदानी खेळांवर भर द्या. चांगले वाचन चिंतन करा.

करिअरच्या अनेक संधी निर्माण आहेत. त्याकडे निराशेने न पाहता आशेने पहा. त्यातून नवीन मार्ग नक्की दिसेल.अध्यात्म हे मन शांतीसाठी आहे. तर विज्ञान सत्य शोधते दोन्हींची सांगड घालून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान कसे देता येईल हे दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींनी केले पाहिजे.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या असून तळेगाव गटातील देवकौठे गावावर सातत्याने प्रेम केले आहे. या गावाने प्रतिकूलतेतून अनुकूलता निर्माण केले असून आज जिल्ह्याच्या नव्हे तर राज्य पातळीवर या गावाचा लौकिक होत असल्याचे ते म्हणाल्या.

याप्रसंगी ज्ञानेश्वर माऊली यांनी अध्यात्म हे मन शांती देते. चिडचिडेपणा आणि धावपळीचे जीवन यावर मात करण्यासाठी वारकरी संप्रदायाने अध्यात्म हा मोठा मार्ग सांगितले. भागवत आरोटे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे यांनीही मनोगते व्यक्त केली.

महिलांची लक्षणीय उपस्थित असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता जगदंबा मातेच्या आरतीने झाली. यावेळी देवकौठे सह पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

