रिमझिम पाऊस व तरुणाईच्या जल्लोषात एकविराचा दांडीया महोत्सव संस्मरणीय

प्रतिनिधी —

महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा व वैभवशाली शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या संगमनेर शहरात एकविरा फाउंडेशनच्या वतीने झालेल्या दांडियाच्या वेळी आलेला रिमझिम पाऊस आणि महिला व युवतींचा जल्लोष यामुळे मोठ्या उत्साहात झालेला दांडिया महोत्सव संस्मरणीय ठरला.

यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात एकविरा फाउंडेशनच्या वतीने दांडिया महोत्सव २०२२ संपन्न झाला. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात, शरयु देशमुख आदींसह संगमनेर शहरातील विविध महिला उपस्थित होत्या. यावेळी आर.जे. सुमित, सुर नवा ध्यास नवा फेम राधा खुडे व दांडिया स्पेशलिस्ट रिचा भडके यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात एकच रंगत भरली.

अत्यंत आकर्षक रोषणाईने केलेले भव्यदिव्य स्टेज, लाईट व्यवस्था, एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टिम बैठक व्यवस्था यामुळे अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात दांडिया सुरू झाल्या. याचवेळी रिमझिम पावसाचे आगमन झाले. जगदंबा मातेच्या आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर अमृतवाहिनी मॉडेल स्कूल, निडो स्कूल व इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या सामूहिक गरबा नृत्याने कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढवली.

रिमझिम पावसात राधा खुडे ने गायलेले ‘पाहूणं जेवण करा, कोळीगीत व विविध लोकगीतांवर महिला भगिनींनी केलेले दांडिया नृत्यास भरभरून दाद मिळाली. यावेळी आलेल्या रिमझिम पावसात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन-चार वर्षापासून अत्यंत नीटनेटके आयोजन करून दांडिया महोत्सव संपन्न होत असतो. यावर्षीचा हा दांडिया महोत्सव आपल्या सर्वांसाठी संस्मरणीय आहे. भर पावसातही इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात हे आपल्या सांस्कृतिक वैभवतेचे प्रतीक आहे.

तर डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, नवरात्र उत्सव हा महिलांचा सन्मान वाढवणारा उत्सव आहे. यावर्षी सर्वत्र मोठ्या आनंदाने नवरात्र उत्सव साजरा झाला आहे. एकविराच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सातत्याने होत असून या दांडिया महोत्सवातून आपण सर्वजणी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहोत.

यानंतर सुमारे दोन तास रिमझिम पाऊस आणि देवीचे विविध गीते याचबरोबर दांडिया गीतांवरती माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, पूर्वा वळसे, डॉ. जयश्री थोरात, शरयु देशमुख यांसह संगमनेर शहरातील महिला व युवतींनी गरबा नृत्यासह दांडीयांचा आनंद घेतला.

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला, तरुणाई वर्ग, शिस्तबद्ध झालेल्या कार्यक्रम, पावसाची रिमझिम, आकर्षक व्यवस्था यामुळे एकविराचा दांडिया महोत्सव हा संस्मरणीय ठरला.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!