हजारो भक्तांच्या हजेरीने शिरपुंजे भैरवनाथाची यात्रा संपन्न !
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या निसर्गाच्या नंदनवनात अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील भैरवनाथ गडावर दिवाळीच्या पूर्वसंध्येला धनत्रयोदशीच्या दिवशी यात्रेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. गडावरील वातावरण यामुळे प्रफुल्लित झाले होते.

अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील भैरवनाथ गडावर दिवाळीच्या पूर्वसंधेला भाविकांची एकच झुंबड उडाली होती.
भैरवनाथ गड शिरपुंजे गावाच्या पायथे पासून साधारण चौदाशे मीटर उंच गडावर आहे. गडावर जाण्याच्या मार्गावरील यात्रेला ‘वाट’ असे ही म्हणतात. वाट म्हणजे ज्या महिलांना मुलबाळ होत नाही त्या महिला पायथ्यापासून केसाने मार्ग झाडीत गडावर जातात. असे जुने जाणकार ग्रामस्थ सांगतात.

आज यात्रेसाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावल्याने गडावर गर्दी झाली होती. गड मार्गावर जागो जागी वन्यजीव विभागाने लोखंडी रेलिंग लावल्याने भाविकांचा थोडा त्रास कमी झाला होता. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भैरवनाथाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

शिरपुंजाचे भैरवनाथ हे आदिवासी समाजाचे दैवत असल्यामुळे येथील आदिवासी समाज धनत्रयोदशीच्या दिवशी भात पिकाचे नैवेद्य घेऊन भैरवनाथ गडावर जात असतात.

दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा भरते. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी वन परिक्षेत्राधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गार्ड व स्थानिक मुलांच्या मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच राजुर पोलीस स्टेशनच्या वतीने होमगार्ड व पोलीस तैनात करण्यात आले होते.

या वेळी आमदार डॉ. किरण लहामटे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे यांनीही येथे भेट दिली. तसेच शिरपुंजे गावचे सरपंच भाऊ धिंदळे, विजय घोरपडे, साईनाथ धिंदळे, मोहन धिंदळे, हैबत धिंदळे, गंगाराम धिंदळे, दारकू महाराज धिंदळे व भैरवनाथ तरुण मित्र मंडळ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

