प्रतिनिधी
संपूर्ण संगमनेर शहरात ज्या-ज्या वार्डात प्रभागात नगरपालिकेची कामे झाली आहेत. त्या त्या ठिकाणी पाहणी करून निकृष्ट दर्जाची कामे झालेले असतील व जेथे गैरप्रकार झाले असतील तेथ जाऊन ती उघड करणार असून त्यासाठी कॉर्नर सभा घेऊन जनतेचे प्रबोधन करणार आहोत. तसेच अमरधाम बोगस टेंडर प्रकरणी प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीवर आम्ही ठाम आहोत.
असे प्रतिपादन भाजपचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी केले आहे.
संगमनेर अमरधाम बोगस टेंडर प्रकरण राजकीय दृष्ट्या ऐरणीवर आलेले असताना आज शहर भाजपच्या वतीने गैरव्यवहाराच्या आरोपात वैकुंठवासी झालेल्या बोगस टेंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार होती. मात्र कोरोना निर्बंधांमुळे प्रशासनाकडून अंत्ययात्रेस परवानगी मिळाली नाही. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर वैकुंठवासी बोगस टेंडरची शोकसभा घेण्यात आली.
यावेळी प्रतीकात्मक बोगस टेंडरच्या फोटोला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
टेंडर प्रक्रिया थांबवली
दरम्यान अमरधाम नुतनीकरण आणि बांधकाम व सुशोभीकरण प्रकरणी काढण्यात आलेल्या दोन टेंडर ची प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. असे नगर पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. पहिल्या टेंडर नंतर अमरधाम चे काही काम झाल्यावर नगरपालिकेकडून दोन टेंडर काढण्यात आले होते. याची किंमत सुमारे पस्तीस लाख रुपये होती. यावरूनच हा विषय ऐरणीवर आला होता. आता नगरपालिका प्रशासन अलर्ट झाले असून निविदा प्रक्रिया थांबवली आहे.
सत्ताधार्यांचे अनाकलनीय मौन
अमरधाम बोगस टेंडर प्रकरणी संगमनेर भाजपच्यावतीने आंदोलन सुरू झाल्यानंतर हे आंदोलन प्रसिद्ध पुरते असल्याचा आरोप सत्ताधारी समर्थक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. मात्र जसजसे यातले धागे-दोरे उघड होत गेले तसे सत्ताधार्यांकडून याबाबत आता मौन बाळगण्यात येत आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली होती. मात्र तीही निष्फळ ठरली. त्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांकडून या बोगस टेंडर प्रकरणी कोणीही बोलण्यास तयार नाही. सत्ताधार्यांचे हे मौन विरोधकांच्या आरोपांना पुष्टी तर देत नाहीत ? अशा शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
कोरोना नियमांमुळे अंतयात्रा परवानगी न मिळाल्याने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या शोकसभेत ॲड. श्रीराम गणपुले यांनी नगरपालिकेवर विविध आरोप केले आहेत व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह पुन्हा धरला आहे. यावेळी माजी नगरसेवक जावेद जहागीरदार, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, नगरसेवक मेघा भगत, सुनील खरे, किशोर गुप्ता, दीपक भगत, शकिर मस्तान, कैलास भरीतकर, प्रकाश राठी, शाम कोळपकर, राहुल भोईर, कृपाल डंग , दीपक रावळ, प्राजक्ता बागुल, कांचंन ढोरे, कांचन मोंढे, सुरेखा खरे,
दीपेश ताटकर, सागर भोईर, रोशन कोथमिरे, प्रकाश दिघे, ऋषिकेश मूळे, विकास जाधव, पवन गाडे, संतोष पठाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
