विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार प्रेरणादायी — रोहिणी गुट्टे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समितीचा गुणगौरव सोहळा
प्रतिनिधी —
विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या व समर्पित वृत्तीने समाज घडविणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार हा त्यांना प्रेरणा देणारा व जबाबदारी वाढविणारा आहे असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवार, पुणे च्या संचालिका रोहिणी गुट्टे – नागणे यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती संगमनेर आयोजित विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा साईबाबा हॉल संगमनेर महाविद्यालय येथे संपन्न झाला. त्यानिमित्ताने त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे उपस्थित होत्या.

जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीला धुमाळ, वृषाली कडलग व अशोक शेटे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.
आपल्या भाषणात रोहिणी गुट्टे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची वृत्ती असते. स्वतःवर विश्वास ठेवला तर ते निश्चितच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. अध्यक्षपदावरून बोलताना संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी शिक्षकांनी समर्पित वृत्तीने कार्य करावे असे आवाहन केले. विद्यार्थी व शिक्षक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शिक्षण विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी व्ही-स्कुल (वोपा) यामध्ये योगदान देऊन पंचायत समिती संगमनेरचे नाव राज्यभरात पोहोचवणाऱ्या तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ आयोजित निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धेत विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेतून प्रथमच ‘एन.एम.एम.एस’ शिष्यवृत्तीधारक झालेली खांडगाव शाळेतील सायली विठ्ठल खरे, दिव्यांग असूनही दहावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल बिरोबा विद्यालय रहिमपूरची श्रावणी बाबासाहेब वाळुंज, ‘एन.एम.एम.एस’ मध्ये पहिला दिव्यांग शिष्यवृत्तीधारक झालेला श्रमशक्ती मालदाड विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत भीमराज भालेराव यांचा कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी दशरथ धादवड, साखरे, भागवत, केंद्रप्रमुख प्रभाकर रोकडे, अशोक गोसावी, राजू राहणे, सुनील ढेंरगे, विलास आवारी, गोरक्षनाथ भोकनळ, अश्विनी मेहेर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी मंदा दुर्गुडे, योगेश मोरे व महेश काळे, वैशाली गुंजाळ, संगीता गायकवाड, सुजाता वाघ, दत्ता लेंडाळ, संदीप कवडे, महेश मोहिते नंदू रकटे, गंगाधर टेंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय सुनील घुले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ घुले यांनी तर आभार प्रदर्शन दिगंबर फटांगरे यांनी केले.

