समाजसेवेचा वसा कायम ठेवणार — विक्रम नवले
प्रतिनिधी —
अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा जबाबदारीची जाणीव करून देतो. हा विजय आमच्यावर विश्वास टाकणार्या सर्वांना समर्पित करतो. पुढील वाटचाल करत असताना समाजसेवेचा वसा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक विक्रम मधुकर नवले यांनी केले.

अभिनव शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या या यशाबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक मधुकर नवले हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमबीए महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. अनिल बेंद्रे यांनी केले. अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने विक्रम नवले यांचा वडिल मधुकरराव नवले, आई सुमन नवले व पत्नी राधिका नवले यांच्यासमवेत सत्कार करण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मधुकर नवले यांनी मार्गदर्शन करताना अगस्ती कारखाना ही भाग्यलक्ष्मीच नव्हे मायमाऊली आहे. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावं लागेल. ‘ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावीत’ प्रत्येकजण समाजाचे देणे लागत असतो. समाजकारणात सत्ता हे ‘साधन’ असायला हवे ‘साध्य’ नाही. असे म्हणत मतदानाचा हक्क कुणीही टाळू नये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी चारित्र्यसंपन्न लोकांनी राजकारणात यावं असेही आवाहन केले.

यावेळी त्यांनी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या काही आठवणींना उजाळा देत ऐतिहासिक दाखलेही दिले. संस्थेच्या पदाधिकारी डॉ. जयश्री देशमुख यांनी विक्रम नवले यांचे समाजाप्रती दायित्व वाढल्याचे नमूद करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सुमनताई नवले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक विभागाचे इंद्रभान कोल्हाळ यांनी विक्रम नवले ज्यांच्यावर स्वतः रचना केलेले गीत गावून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी सुमनताई नवले, प्राचार्या राधिका नवले, मीराताई नवले, मंगलताई नवले, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव, प्रा. पांडुरंग गुंजाळ, वसुंधरा अकॅडमीच्या प्राचार्या जेनी प्रसाद, सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या स्मिता पराड, मुळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या तिलोत्तमा कर्डिले, एमबीए महाविद्यालयाचे प्लेसमेंट कोऑर्डिनेटर प्रा. शोएब शेख, प्रशासन विभागाचे दिलीपकुमार मंडलिक, अभिनव कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रा. कुसुम वाकचौरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्र संयोजिका प्रा. रोहिणी गुंजाळ, संस्था समन्वयक ज्योती मंडलिक, नृत्यांजली देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हेमंत मंडलिक यांनी मानले.

