युवा कीर्तनकारांच्या जुगलबंदीने महिला मंत्रमुग्ध !
मथुरागिनी महिला मेळाव्यात स्त्री – पुरुष समानतेचा जागर
प्रतिनिधी —
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. या वारकरी परंपरा व पुरोगामी विचार संगमनेर तालुक्यात रुजला आहे. चांगल्या समाजासाठी स्त्री पुरुष हे दोन्ही महत्त्वाचे असून यावर आधारित कीर्तनच्या जुगलबंदीने महिला मेळाव्यातील हजारो महिला व संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले.

यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी कीर्तनाची जुगलबंदी युवा कीर्तनकार ह.भ प. उन्नतीताई तांबे व युवा कीर्तनकार ह.भ प. मुक्ताताई चाळक यांच्यामध्ये स्त्री पुरुष समानतेवर प्रबोधनात्मक जुगलबंदी झाली. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार यशोमती ठाकूर, सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, कांचन थोरात, डॉ. जयश्री थोरात, सुवर्णा मालपाणी. शरयु देशमुख, लक्ष्मण कुटे, मिलिंद कानवडे, जगन्नाथ घुगरकर , राजश्री तिकांडे यांसह विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आपुलिया हिता जो असे जागता, धन्य ते माता पिता तयाचिया या अभंगावरून मुक्ताताई व उन्नती ताई यांनी स्त्री पुरुष श्रेष्ठत्व व समानतेचे विविध दाखले दिले. या प्रसंगी मुक्ताताई चाळक म्हणाल्या की, आई-वडिलांनी आपल्याला मोठे कष्टातून वाढवलेले असते. वृद्धकाळात त्यांना वृद्धाश्रमात टाकू नका. महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे. मोठी परंपरा आहे. ही आपण जपली पाहिजे.

तरुणांनी फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा ज्ञानाने आपली उंची वाढवा. सात्विक मुले ही आई-वडिलांची खरी संपत्ती असते. मुलगा मुलगी भेद करू नका. मुलीच्या जन्माचे स्वागत करा तर मुलाच्या जन्माचे कौतुक करा.
तर उन्नतीताई तांबे म्हणाल्या, ज्या ज्या वेळी मुलींना संधी मिळते त्या त्यावेळी त्यांनी संधीचे सोने केले आहे. या राज्याला व देशाला कर्तृत्ववान महिलांचा इतिहास आहे. हा समृद्ध वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अंधश्रद्धेला बळी न पडता शिक्षणातून समाज प्रबोधन करा. असे सांगताना त्यांनी विविध दाखले दिले .

या जुगलबंदीत श्रवणीय संगीत साथ, गायनाचार्य, मृदुंगाचार्य याचबरोबर सांगवी येथील वारकरी विद्यालयातील विद्यार्थिनींनी दिलेली साथ ही लक्ष वेधून घेत होती.

