दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे युवा जल्लोष ची धमाल !
प्रतिनिधी —
भरत नाट्यमने सुरुवात झालेल्या युवा जल्लोष धमाका कार्यक्रमात अप्रतिम बिहू नृत्य, भांगडा, लावणी, आदिवासी नृत्य, राजस्थानी नृत्य, मराठमोळा विंचू चावला, बासरी वादन, वंदे मातरम, फ्युजन डान्स, गवळणी याबरोबर एकावरचढ एक लोकगीतांच्या सादरीकरणाने युवा जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रमात धमाल झाली असून हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला आहे.

यशोधन प्रांगणात स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या युवा जल्लोष धमाका हा अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात, डॉ.हसमुख जैन, जगन्नाथ घुगरकर, बाबुराव गवांदे, किरण कानवडे, डॉ. सुजित खिलारी, अनिल थोरात, भास्कर खेमनर, भास्कर पानसरे, सतीश गुंजाळ, दशरथ वर्पे, रामदास तांबडे, एम.वाय.दिघे, अभिजीत बेंद्रे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सह्याद्री प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘भाग मेरो मोहनाई समूह नृत्याने सर्वांना भारावून टाकले. तर मालपाणी विद्यालयाच्या ‘बेटी बचाव बेटी पढाव या एकपात्री प्रयोगाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या कृष्ण लीला कथेने अंगावर शहारे आले. तर भाऊसाहेब थोरात विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी ‘दिंडी निघाली पंढरपुरी या समूह नृत्याने धमाल उडवून दिली. वडगाव पान विद्यालयाच्या ‘जानू विना रंगच नाही या लावणी नृत्यांनी प्रत्येकाला ठेका धरायला लावला. तर अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या ‘हाय सरगुजा नाचे संग आदिवासी नृत्यने अनेक जण भारावले. चंदनापुरीच्या विद्यालयाने सादर केलेली क्लासिकल वंदे मातरम लक्षात राहणारे ठरले.

तर कनोली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे समोर नृत्यावर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. आदिवासी आश्रम शाळा कोळवाडेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली आदिवासी नृत्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. तर वडगाव विद्यालयाच्या ‘मुळीच नव्हते रे कान्हा या समूह नृत्याने धमाल केली. कनोली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कोळीगीतेला प्रत्येकाला ठेका धरायला लावला. तर जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘मी जिजाऊ बोलते नाट्यछटेने प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. सह्याद्री जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ‘संदेशे आते हे गीताने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले. तर एसएमबीटी डेंटल कॉलेजच्या मुलीने सादर केलेल्या फ्युजन डान्सला तरुणांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सह्याद्री जुनियर कॉलेजच्या ‘ये किशना है या गाण्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. तर ‘चला हो पंढरीला जाऊ या संगमनेर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायलेले अभंगाला रसिक श्रोते यांनी भरभरून दाद दिली. यावेळी निवेदिका प्रणोती कदम यांनी सुंदर निवेदन केले.

आकर्षक लाईट व्यवस्था,भव्यदिव्य स्टेज, उत्तम नियोजन, बैठक व्यवस्था, यामुळे या कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढली. संगमनेर शहर आणि ग्रामीण भागातील महिला, युवक, पुरुष यांसह मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती लाभलेला हा कार्यक्रम संगमनेर करांसाठी संस्मरणीय ठरला.

