‘दुश्मनी अच्छी नही मुझे दोस्त बनाकर देख’ ! —
महसूल मंत्री विखे पाटलांची संगमनेरात शेरोशायरी

प्रतिनिधी —
‘दुश्मनी अच्छी नही मुझे दोस्त बनाकर देख’ असा शेर पेश करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कव्वालीच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली. निमित्त होते संगमनेर शहरातील ख्वाजापीर मोहंम्मद सादीक दर्गाह ट्रस्टच्या उर्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या कव्वाली कार्यक्रमाचे.

मंत्री विखे पाटील यांनी दर्ग्याचे दर्शन घेवून चादर चढवली, ट्रस्टचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष निसारभाई धांदल, उपाध्यक्ष निसारभाई शेख, विश्वस्त जावेदभाई जहागिरदार, कदीर शेठ शेख, हाजी फजलू रहेमान, शम्मू हाजी लाला बेपारी शरीफ शेख, रउफ शेख, एजाज देशमुख यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांचे जोरदार स्वागत केले.

संगमनेरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतिक म्हणून या उत्सवाकडे आपण पाहातो. यापुर्वीही आपण या दर्ग्याचे दर्शन घेतले. ही परंपरा विखे पाटील परीवाराने कायम जोपासली असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, स्व.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी येथील कार्यकर्त्यांशी जोडलेला ऋणानूबंध हा वृंध्दीगत होत गेला. खासदार साहेबांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तेव्हासुध्दा सर्व समाज बांधवांनी त्यांना पाठबळ दिले याची आठवण करुन देत मंत्री विखे पाटील यांनी या दर्ग्याचे दर्शन घेतल्यानंतर एक नवी उमेद मिळते. समाजात एकतेचा संदेश देणारे हे पवित्र स्थान हे माझ्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.

मंत्री विखे पाटील यांच्यासह उद्योगपती मनिष मालपाणी, भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष डॉ.अशोक इथापे, अमोल खताळ, सतीष कानवडे, किशोर नावनंदर, राहुल भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काही वेळ कव्वालीचा आनंद घेतला.

या उत्सवाला शुभेच्छा देवून मंत्री विखे पाटील यांनी ‘कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख’ ‘दुश्मनी अच्छी नही, मुझे दोस्त बनाकर देख’ हा शेर पेश करुन, कव्वाली कार्यक्रमाची रंगत वाढविली. ही शेरोशायरी नेमकी कोणाला उद्देशून करण्यात आली. याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.

