बदल्यांसाठी घेतलेले पैसे परत करावे लागतील – खासदार डॉ. सुजय विखे पाटील
दोन महसूल मंत्र्यांमध्ये काय फरक असतो हे दाखवून देऊ
प्रतिनिधी —
महसूल विभागातील बदल्यांसाठी जे पैसे घेतले आहेत ते पैसे आता परत करावे लागतील आणि ते आता कॅश मध्येच परत करावे लागतील अशी घणाघाती टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे.

खासदार विखे पाटील यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खाते मिळाल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही टीका केली आहे.
खासदार विखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंतर महसूल आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास हे खाते मिळाल्यावर आपली सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खासदार विखे पाटील म्हणाले, महसूल खाते हे काही सोन्याची खाण नाही. संविधानिक दृष्टिकोनातून हे उच्च खाते आहे. असे आम्ही समजतो. राजकीय संघर्षानंतर भारतीय जनता पक्षाने आम्हाला जो मान सन्मान दिला आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. कार्यक्षमता पाहून आम्हाला कधीच न्याय मिळाला नाही. ज्या पक्षात आधी होतो त्या पक्षात आम्हाला कायम संघर्ष करावा लागला.
ज्यांनी कोणी या आधी बिनखात्याचे मंत्री वगैरे वगैरे आरोप प्रत्यारोप केले आहेत. राजकारण केले आहे. त्यांची तोंडे बंद करायची आहेत. जे कोणते खाते मिळेल त्यामध्ये वेगळेपण दिसावं हाच आमचा नेहमी उद्देश राहिला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे काम करणे हाच आमचा नेहमी हेतू राहिला आहे.

आम्हाला जी संधी मिळाली आहे, जेवढ्या काळासाठी ही संधी मिळाली आहे त्या काळात आम्ही राज्याला दाखवून देऊ की दोन महसूल मंत्र्यांमध्ये काय फरक असतो.
सर्वसामान्यांना कूपन मिळवण्यासाठी, नोंदणीसाठी, सातबारा उताऱ्या साठी पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच वाळू माफियांचा सुद्धा बीमोड होणार आहे.
