शिंदे फडणवीस सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि माफियांना थारा नाही — महसूल मंत्री विखे पाटील

प्रतिनिधी —

शिंदे फडणवीस सरकार हे लोकांसाठी काम करणारे आहे. राज्यात पुन्हा विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून,नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आणि माफीयांना थारा नसेल, तर सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री विखे पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन संगमनेर मध्ये करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. जेष्ठ नेते वसंतराव गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, ॲड.बापुसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, जावेद जहागिरदार, उद्योगपती मनिष मालपाणी, अमोल खताळ, डाॅ.सोमनाथ कानवडे, शिवाजीराव धुमाळ महीला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, डाॅ.भानूदास डेरे, विक्रमसिंह खताळ, सतिष कानवडे, भाजयुमोचे श्रीराज डेरे, दिपेश ताटकर, माजी नगसेविका मेधा भगत, शिरीष मुळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी मागील आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. कोणत्याही निर्णयासाठी आघाडी सरकारचे मंत्री केंद्राकडे बोट दाखवत होते. मग मंत्री काय भजे तळत होते का असा सवाल करून मागील अडीच वर्षात जनतेच्या हिताचा एकही निर्णय होवू शकला नाही. पेट्रोल डिझेल वरील कर कमी न करता या सरकारने दारुचे दर कमी केले. या सरकारमध्ये फक्त वसुलीचा कार्यक्रम सुरू होता. ज्यांना कोणताही निर्णय करता आला नाही तेच आज आम्हांला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी वाचून दाखवत आहे. परंतू हे राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प सरकारने केला असल्याचे विखे म्हणाले.

कोव्हीड संकटात हा देश फक्त पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयामुळे वाचला. मोफत धान्य, मोफत लस देवून कोट्यावधी भारतीयांना दिलासा देण्याचा निर्णय घेत्ल्यामुळेच मोदी विश्वनेता ठरले असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, माजी मुख्यमंत्री फक्त लस खरेदी करण्यासाठी साडेसहा हजार कोटीचा धनादेश तयार असल्याचे सांगत बसले परंतू आघाडी सरकारची एवढी पत गेली होती की निविदा भरायला कंपन्या सुध्दा आल्या नसल्याची टिका करून नव्या सरकारने कोव्हीड संकटात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी पर्यतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय केला असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असल्याचे आश्वासित करून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाकरीता प्रधानमंत्री ग्रामासडक योजना सुरू करताना मागील सरकारच्या काळात फक्त घोषणा झाल्या परंतू अंमलबजावणी नव्हती. मात्र आता लोकांसाठी काम करणारे सरकार आले आहे. आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला नव्हे कामाला प्राधान्य असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

निळवंडे कालव्यांच्या संदर्भात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पहील्या वीस किलोमीटर मध्ये कामाची सुरूवात झाल्यामुळे पुढची काम सुरू झाली. अनेक जण आपल्या सह्याचे फ्लेक्सबोर्ड लावून पाणी देणार सांगत होते. परंतू निळवंडे कालव्यांच्या कामाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस आणि मधुकरराव पिचड यांचे असल्याचा आवर्जून उल्लेख करतानाच कालव्याचा कामाचा आढावा घेवून लाभक्षेत्रात पाणी देण्यास सरकार कटीबध्द राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

तालुक्यात वाळू माफीयांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सामान्य माणसाच्या घरात बंदूका घेवून जाण्याची मुजोरी वाढली आहे. परंतू आता या वाळू माफीयांचा माजही उतरावा लागेल. यासाठी सरकार महीन्याभरात वाळूचे सर्वकंष धोरण आणणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. अधिकाऱ्यांनी सुध्दा कोणाच्या कार्यालयातून आलेल्या फोनवर काम करण बंद करा. सरकार आता बदलले आहे याची जाणीव ठेवा. लवकरच तालुक्यातील प्रश्नसाठी आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहीती जनतेला जावून सांगा. मागील अडीच वर्षात मोदीजीनी घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येकजण लाभार्थी आहे. या कामाची माहीती कार्यकर्त्यांनी गावोगावी जावून सांगा कारण योजना आपल्या आणि श्रेय घेतात याची जाणीव ठेवा. आगामी निवडणुकांचा आपला अजेंडा हाच असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रतशित भाजप करण्याची तयारी करण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले.

याप्रसंगी अध्यक्ष वसंतराव गुंजाळ, डॉ, अशोक इथापे, श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, सतिष कानवडे यांची भाषण झाली. कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम सामुहीकपणे कार्यक्रमापुर्वी पाहाण्यात आला.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच अनेकांनी उभे राहून प्रश्न मांडायला सुरूवात केली.सर्वाचे प्रश्न ऐकून घेत त्यांनी सांगितले की नव्या सरकारचा हा परीणाम आहे.आमच्या सभेत तुम्हांला बोलता येते, इतरांच्या सभेत तुम्हांला बोलू दिले असते काॽ असा प्रश्न करून जनतेच्या मनातील हे सरकार आहे हे सांगायला मंत्री विसरले नाहीत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!