महाराष्ट्र काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर — आमदार विखे पाटील
प्रतिनिधी —
फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी आंदोलनं करण्याची वेळ आली असल्याची टिका भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

राज्यात काँग्रेस पक्षाच्या सुरु असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत राज्यातून 16 मतं द्रोपदी मुर्मू यांना पडली हे त्याचेच द्योतक आहे. सरकारमध्ये असताना काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व दाखवू शकला नाही आता सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरु झालेली आंदोलनं ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती उरली आहेत. भविष्यात जनताच आता यांना बुस्टर डोस देणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

राज्यात मंत्रीमंडळ कधी स्थापन होईल या प्रश्नांवर बोलताना विखे पाटील म्हणाले की, याबाबतचे सर्व निर्णय पक्षाच्या वरिष्ठा स्तरावर होतील. त्यामुळे मी अधिक बोलणे उचित होणार नाही. मंत्रीमंडळ नसले तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही राज्याकडे बारीक लक्ष आहे. प्रशासनाचे काम व्यवस्थित सुरु आहे. राज्यात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतरही दोघांनीही तातडीने घेतलेले निर्णय महत्वपूर्ण आणि दिलासा देणारे ठरले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून त्यामुळे विरोधकांनी फार चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
