शिर्डीला आता भाजपचा खासदार !
आमदार राधाकृष्ण विखे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
भाजपचे मिशन सुरू
प्रतिनिधी —
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडणून येणारा खासदार हा शिर्डी लोकसभा मतदार संघाचा असेल या दृष्टीने सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी १८ महिन्याचे नियोजन करुन, प्रत्येक विधानसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या योजनांचे काम घेवून मतदारांपर्यंत पोहोचा असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत शिर्डी मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आणण्यासाठी पक्षाने आजपासून मिशन लोकसभा सुरु केले. प्रदेश स्तरावरील पदाधिका-यांसह उत्तर नगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या संघटनात्मक बैठकीत मतदार संघातील राजकीय, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपूरे, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आ.डॉ.राहुल आहेर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनिल वाणी, जालींदर वाकचौरे, सुभाष वाहाडणे, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांच्यासह सर्व तालुक्यांचे प्रमुख आणि इतर आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीकरीता भारतीय जनता पक्षाने देशभरात तयारी सुरु केली आहे. देशातील १४४ मतदार संघातून इतर पक्षांचे खासदार निवडून गेले आहेत. या सर्व मतदार संघामध्ये भाजपाच्या नेतृत्वाने लक्ष केंद्रीत करुन, कोणत्याही परिस्थितीत या मतदार संघातून भाजपाचे कमळ फुलविण्याचा निर्धार केला आहे. संघटनात्मक स्तरावर राज्यातही अशा मतदार संघाची जबादारी विविध पदाधिकाऱ्यांवर देवून मिशन लोकसभा सुरु केले आहे.

शिर्डी मतदार संघातून शिवसेनेचे खासदार निवडूण गेले आहेत. येणाऱ्या काळात मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये संघटनात्मक काम वाढवितानाच केंद्र सरकारच्या योजनांची माहीती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत करण्यात आला. या मतदार संघात भाजपाचा उमेदवार विजयी व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. लोकसभा मतदार संघाची जबाबदारी एका केंद्रीय मंत्र्यावर देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेवून मागील आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविणे हीच मोठी जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचे नमुद करुन, मोदींसारखा विश्वनेता आपल्या पाठीशी असल्याने भारतीय जनता पक्षाचा जनाधार आता वाढत चालला आहे. येणाऱ्या काळात सर्व निवडणूका पाहाता तालुका स्तरावर गाव, गट आणि प्रभागांमध्ये नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आ.राहुल आहेर म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून भाजपाचे ४५ खासदार निवडणून आणण्याच्या केलेल्या घोषणेमध्ये शिर्डी मतदार संघाचा समावेश असावा यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर यांनी तत्कालिन कोपरगाव मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे भिमराव बडदे खासदार झाल्याचा इतिहास जागृत करुन, या मतदार संघाची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहाता येणा-या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार निवडून जाण्यास कोणतीही अडचण नाही फक्त पक्ष संघटनेच्या सर्व पदाधिका-यांनी वेळ देवून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
