
ठाकरे आडवा येतो !!
संगमनेर टाइम्स विशेष —
राजा वराट
दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना लोकशाहीच्या, अहिंसेच्या मार्गाने आडवा येत महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. “गांधी आडवा येतो” याची सुरुवात तेथेच झाली. तेव्हापासून हा गांधी मनुवाद्यांना, ब्राह्मणवाद्याना, धर्मवाद्यांना, जातीयवाद्यांना अडचणीचा ठरू लागला. आडवा येऊ लागला. गांधीच्या विचाराला मारणे जमले नाही म्हणून तीन गोळ्या घालून महात्म्याची हत्या करण्यात आली. मनुवाद्यांना आडवा येतो तो गांधी, माणुसकीने जगायला शिकवणारा तो गांधी, जगात कुठेही जायचे असेल तर गांधी त्यामुळे कितीही सोंग ढोंग केली तरी लोकशाहीच्या विरुद्ध हुकूमशाही निर्माण करणाऱ्या मनुवादी राष्ट्रासाठी गांधी नेहमीच आडवा येतो.

असे आडवे येण्याचे काम महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या त्या काळात केले. याची सुरुवात गोतम बुद्धां पासून झाली. आधुनिक काळातील सत्यशोधक विचारांच्या महापुरुषांनी ते चालू ठेवले.
बेगडी, खोटारड्या आणि भुरट्या सत्तालोलूप हिंदुत्ववाद्यांना आणि मनुवाद्यांना पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे आडवा येऊ लागला आहे. “आता… ठाकरे आडवा येतो” अशी मनुवाद्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे अश्या ठाकर्यांना जनतेच्या प्रेमातून, समाजातून आणि राजकारणातून कसे संपवता येईल यासाठी मनुवाद्यांनी देशातल्या सर्व यंत्रणा हाताशी धरून हुकूमशाही पद्धतीने आडवा येणाऱ्या ठाकर्यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी विविध प्रयोग केले.

मीडिया, न्यायव्यवस्था, शासकीय यंत्रणा, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, केंद्रीय राखीव पोलीस दले या सगळ्यांचा अगदी मनसोक्त वापर केला. तरीही ठाकरे आडवा येतोच. म्हणून घरभेदी बैलांची टोळी गोळा करून ठाकरेंना सत्तेपासून दूर करण्यात मनुवादी कारस्थान यशस्वी झाले असले तरी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनातून ठाकरे यांना दूर करणे त्यांना शक्य झाले नाही. देशात आणि संपूर्ण राज्यात सर्वसामान्य जनतेच्या मनात ठाकरेंविषयी आदर आणि प्रेम अधिकच वाढल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

राजीनामा देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे भाषण केले ते भाषण सुद्धा आता मनुवाद्यांना आडवे येणार आहे. भविष्यात कुठलेही वाईट काम करताना ठाकरे आडवा येणारच. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद, प्रबोधनकारांचा विचार, पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा, महात्मा गोतम बुद्धांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सत्य, अहिंसा, समता, न्याय, बंधुता याचे बाळकडू मिळालेले ठाकरे मनुवाद्यांना पुन्हा आडवे येणारच.

महाराष्ट्रातील जनतेच्या काळजाला हात घालणारे, जनतेवर मनापासून प्रेम करणारे ठाकरे विधानसभेच्या त्या चार खोल्यांमधून बाजूला गेले. मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाच्या घरातून ते कधीच बाहेर जाणार नाहीत हे दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समारोपाच्या भाषणाने ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया पाहता ठाकरे यांनी मनुवाद्यांची चांगलीच भंबेरी उडवली असल्याचे दिसून येत आहे. मनुवाद्यांचे कोणतेही मनसुबे महाराष्ट्राने कधीच पूर्ण नऊ दिले नाहीत आणि इथून पुढेही होणार नाहीत कारण “ठाकरे आडवा येतो.
खोटारड्या हिंदुत्वाचा गवगवा करून, जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेले आता सत्तेचा माज आल्याने देशात अराजक निर्माण केले. जवळजवळ यादवीला तोंड फोडल्यासारखे हे चित्र आहे. याची फळे त्यांना भोगावी लागणार आहेत.

लोकांची घरे पेटवणारे आमचे हिंदुत्व नाही, तर लोकांच्या चुली पेटवणारे आमचे हिंदुत्व आहे. गोरगरिबांच्या पोटाला अन्नाचा घास देणारे आमचे हिंदुत्व आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रस्त्यावर उतरून प्रसंगी आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देणारे आमचे हिंदुत्व आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ही हिंदुत्वाची व्याख्या खोटारड्या हिंदुत्ववाद्यांना नक्कीच परवडणारी नाही. आपल्या राजकीय असुयेला त्यामुळे सुरुंग लागेल आणि भविष्यात आपले अस्तित्वच नष्ट होईल म्हणून काहीही करून ठाकरेंना बाजूला करणे एकच पर्याय या खोटारड्या लोकांकडे होता. त्यांना आज हे शक्य झाले, पण भविष्यात शक्य होईलच असे नाही कारण.. ठाकरे आडवा येतो !
