संयोगिता ढमढेरे यांनी
ईशान्य भारताच्या आणि देशाच्या सद्यस्थितीवर लिहिलेला आवर्जून वाचावा असा हा खास लेख…

ईशान्य भारत कधी कधी भारतात आहे !

संयोगिता ढमढेरे, पुणे 

 

‘काय झाडी, काय डोंगार’ यावर संपूर्ण महाराष्ट्र हजारो मिम, गाणी, जोक्स करत हसत होता. तेव्हा हे जिथलं वर्णन होतं त्या आसाम आणि त्याची शेजारची राज्य यांनी आपण ईशान्य भारत म्हणतो. तिथले डोंगर ढासळत होते, झाडी पाण्याखाली चालली होती याची ना तिथे ओक्केत असलेल्या आमदारांना काही पडली होती. ना त्यांच्या मागेमागे तिथवर पोहोचलेल्या मराठी मिडियाला. ना कधी ना कधी तिथल्या निसर्गात भटकंती करण्याचं स्वप्न आपल्या बकेट लिस्टमध्ये बाळगणाऱ्या मराठी माणसाला.

एरवी आसाममधला पूर कव्हर करण्यासाठी महाराष्ट्रातून पत्रकार आसामला पोहोचण्याची शक्यता कमीच. त्याच्या जवळच असलेल्या मणिपूर राज्यात तर नाहीच. गेल्या आठवड्यात त्या मणिपूरमधल्या नोने जिल्ह्यात दरड कोसळून २४ जण मृत्युमुखी पडले. त्यापैकी १८जण भारतीय सैन्याच्या १०७ प्रादेशिक सेनेचे जवान होते. या भीषण आपत्तीची बातमीही मराठी माध्यमात आली नाही. दहशतवादी कारवाईत गेले नाहीत म्हणून हे सैनिक शहीद झाले नाहीत असं म्हणता येणार नाही. ते त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी देशभरातून नवीन उभे रहात असलेल्या तुपूल रेल्वे स्टेशनच्या संरक्षणासाठी तिथे तैनात केले गेले होते. गेल्या आठवड्यात तिथे दोनदा दरडी कोसळल्या. नैसर्गिक आपत्तीतून १३ सैनिक आणि ५ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं असलं तरी रविवारपर्यंत १२ सैनिक आणि २६ नागरिक यांचा अजून तपास लागला नव्हता.

बंडखोर आमदार पळून जाऊ नयेत, फुटीत आणखी खिंडार पडू नये यासाठी कोणी सहज उठून चालत, बसने राज्यात, ‘स्वगृही’ परत येऊ शकतील अशा ठिकाणी आमदारांना ठेवणं धोक्याचंच होतं. त्यामुळे विमानात बसल्याशिवाय परतता येणार नाही असं आसाम, त्यांचं मन रमेल असं हॉटेल, घरची आठवण येणार नाही अशी सरबराई असे सगळ्यात सुरक्षित पर्याय निवडणं हे अगदीच अत्यावश्यक होतंच. विशेषत: ज्या तत्वासाठी, ज्या हिदुत्वासाठी आणि ज्या भ्रष्टाचाराविरूद्धच्या तळमळीने हे ‘आंदोलन’ चालू होतं त्यासाठी सुरत, गुवाहाठी, गोवा हा प्रवासही अपरिहार्य होता. आपल्याच देशात आपण कुठूनही कुठे स्थलांतर करू शकतो, आपल्या संविधानाने आपल्याला हे ‘संचार स्वातंत्र्य’ दिलं आहे. आणि आसाम हा तर भारताचा अविभाज्य भाग आहेच, आमचा आहे. मग तिथे पूर आला म्हणून काय झालं? तो तर तिथे दरवर्षीच येतो.

पण नेमका यावर्षीच त्याचं स्वरूप १०० वर्षातून एकदा येतो एव्हढ प्रचंड भीषण आहे. आजवर १५१ लोक जीवाला मुकले आहेत, ३१ लाख लोकांना त्याची झळ बसली आहे. ८८ तालुक्यातली हजारो गावं पूरग्रस्त आहेत. २ लाख ७० हजार लोकांना ४०४ शिबिरात हलवलं आहे. राज्यातले ४८६ रस्ते, १४ पूल उध्वस्त झाले आहेत. सुमारे ६३ हजार हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आहे. आसाम आणि आपला एरवी संबंध येतो तो काझीरांगा भेटीतल्या हत्ती आणि गेंड्यांच्या फोटोतून. त्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातली ३० तर पोबितोरा अभयारण्यातली १० ठिकाणं जलमय झाली आहेत. ७९५ प्राणी मेले तर सुमारे साडे नऊ लाख प्राणी पुरामुळे प्रभावित झाले आहेत. दरवर्षी पुराखाली जाणारं केवळ सिलचर नाही तर आसामध्ये इतरत्रही पाण्याने हाहाकार माजवला आहे. पाऊस थांबल्या वरही जीवन सुरळीत व्हायला आणि पुन्हा उभं राहायला बराच अवधी लागणार आहे.

शेजारच्या अरुणाचल आणि मेघालय राज्यांनाही मुसळधार पावसाने झोडपल्याने इथे जीवित हानी झाली आहे. चेरापुंजीला यावर्षी विक्रमी पाऊस झाल्याची बातमी कळली पण या घनघोर पावसाचा फटका सुमारे सहा लाख लोकांना बसला आहे आणि ३६जण मरण पावले आहेत याची बातमी नाही.

दुसऱ्या राज्यातली विशेषत: ईशान्य राज्यातली हाटीलं आपली असतात, तिथली पर्यटन स्थळं फोटो काढण्यापूरती आपली असतात, तिथली हस्तकला, तिथल्या साड्या, टोप्या आपल्याला हव्या असतात . तिथला गामोसा गळ्यात घालून कॅमेरासमोर स्थानिक फ्लेवर आणण्याचा चटपटीतपणा पत्रकारांकडे असतो. पण हीच तिथल्या माणसांची म्हणजे आपल्या देशबांधवांची, आपल्या सैनिकांची स्थिती इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी आहे हे तिथे गेलेल्या प्रतिनिधीना आणि इथे बसलेल्या त्यांच्या वरिष्ठांना आणि प्रेक्षक/ वाचकांनाही महत्वाचं वाटत नाही. नाही म्हणायला लाजेकाजेस्तव तिथे गेलेल्या आमदारांनी मिळून पूरग्रस्तांसाठी आसाम सरकारला ५१ लाख रुपये दिले आणि त्यांचे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मराठीत ट्वीट करून आभार मानले आहेत.

खरं तर तथाकथित मुख्यभूमीतला पावसाचा अभाव आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या भूभागात चालू असलेला भीषण धुव्वाधार पावसाळा आणि याला कारणीभूत तापमान बदल हा आपला जिव्हाळ्याचा विषय असायला हवा. ब्रम्हपुत्रसारखी महाकाय नदी आणि तिच्या पद्मा, मेघना,जमुना आदि नद्यावरचे बंधारे, साचलेला गाळ, धसलेले किनारे हे पर्यावरणीय धोके तत्कालीन राजकीय धक्कयाहून जास्त काळ प्रभावी ठरणार आहेत. मात्र त्या पुराचं नियंत्रण कसं करावं याचं उत्तर असे अनेक पावसाळे पाहिलेली स्थानिक जनता आणि इथे राजकीय स्थैर्य कसं आणावं हे धक्के पचवलेले मतदार याचं उत्तर सुचवतील अशी आशा.

संयोगिता ढमढेरे, पुणे

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!