सांदण दरी पर्यटकांसाठी बंद !

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव !

प्रतिनिधी —

संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध असलेली आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या अकोले तालुक्यातील सांदण दरीत पर्यटकांना फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

घाटघर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक धबधबे, सांदण (दरी) व्हॅली परिसर हा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती वन्यपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. आडे यांनी दिली आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन आठड्यांपासून मुसळधारपाऊस पडत आहे. साम्रद, रतनवाडी, घाटघर, उडदावणे, कोलटेंभे परिसरात पावसाचे प्रमाणात दोन दिवसांपासून वाढ होत आहे. परिणामी डोंगर माथ्यावरुन धबधबे कोसळताना दिसत आहेत. तर कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्र गड, पांजरे फॉल, अमृतेश्वर मंदिर, वसुंधरा फॉल, उंबरदरा, नेकलेस फॉल, न्हानी फॉल भागात पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे.

डोळ्याचे पारणे फेडणारे व आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये समावेश असलेल्या सांदण व्हॅली पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करीत असतात. परंतु पावसाचा जोर व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील सांदण व्हॅली, कोकणकडा, पावसाने रौद्ररूप धारण केलेले पण धोकादायक असलेले पांढरे शुभ्र धबधबे या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक ती सर्व प्रकारची खवरदारी वन्यजीव विभागाकडून घेण्यात आली आहे. पावसाचे आगर असलेल्या घाटर, साम्रद, रतनवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांदण व्हॅली, धोकादायक धबधबे पर्यटनासाठी बंद केले आहेत. मद्यपान करणारे व पाण्याच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, नाशिक

हौशी पर्यटकन रोखण्यासाठी धोकादायक ठिकाण, धबधबे, व्हॅलीमध्ये (दरी) वन्यजीव विभागाकडून ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. तर सांदण व्हॅलीत उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी कुणीही प्रवेश करू नये. म्हणून वन्यजीव कर्मचाऱ्यांचा बदोबस्त ठेवण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!