माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारसा डॉक्टर जयश्री थोरात !

संगमनेर टाइम्स विशेष —

राजा वराट 

 

माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारसा कोण सांभाळणार ? कोण तो पुढे चालवणार याच्या चर्चा नेहमीच सुरू असतात. आमदार थोरात यांच्या कनिष्ठ कन्या डॉक्टर जयश्री जैन (थोरात) यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी निवड झाल्यानंतर या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. आणि हा नवा राजकीय वारस अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला भिडला असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वच राजकीय नेत्यांचे राजकीय वारस राजकारणात उतरले आहेत. घराणेशाही हा मुद्दा अहमदनगर जिल्ह्यात बिन महत्त्वाचा ठरतो. नगर जिल्ह्यातील सर्वच राजकीय घराण्यांनी आपापली राजकीय सुभेदारी प्रत्येक तालुक्यात व्यवस्थित सांभाळलेली आहे. आजोबा आजोबा नंतर मुलगा, मुलानंतर त्याचा मुलगा, सून, पत्नी, मुली, भाचे, जावई असे विविध सगे सोयरे, भाऊबंद राजकारणात उतरवले गेले आहेत. राजकीय लाभाची पदे त्यांना दिलेली आहेत.

त्यामुळे राजकारणात घराणेशाही हा आरोप जो सातत्याने केला जातो तो नगर जिल्ह्यात बाद ठरलेला आहे. आरोप करणारे किती आरडाओरडा करीत असले तरी प्रत्येकाच्या पक्षात घराणेशाही आहे. आणि त्यांचे कोणत्या ना कोणत्या घराणेशाहीला समर्थन देखील आहे. वस्तुस्थिती मात्र कोणीही सांगत नाही.

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची कनिष्ठ कन्या डॉक्टर जयश्री जैन (थोरात) यांनी थेट राजकीय पक्षात पद मिळवून पक्षीय राजकारणात उडी मारली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

आमदार थोरात यांनी आपला वारसा सांभाळण्यासाठी मुलीला पक्षीय राजकारणात उतरवले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डॉक्टर जयश्री यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदी निवड झाली आहे. थोरात यांच्या घराण्यातील म्हणजे दस्तुर खुद्द आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मुला मुलींपैकी डॉक्टर जयश्री थोरात या राजकीय पक्षात पदाधिकारी होणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉक्टर जयश्री यांनी संगमनेर हे कार्यक्षेत्र निवडून संगमनेरात समाज सेवा करण्याचे विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यांच्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्याच वेळी त्यांना संगमेरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काहीतरी काम करायचे आहे असे दिसून येऊ लागले होते. डॉक्टर जयश्री यांचे राजकीय कार्यक्षेत्र संगमनेर आहे असे बोलले जात होते. आता त्यांनी राजकीय पक्षाचे पद घेऊन संगमनेर तालुकाच नव्हे तर अहमदनगर जिल्हा आपले राष्ट्रीय क्षेत्र असल्याचे एक प्रकारे जाहीरच केले असल्याचे बोलले जात आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांना स्थानिक पत्रकार कधी कधी, अधून मधून तुमचा वारसदार कोण असा सवाल करत असत. तेव्हा थोरात त्यांच्या नेहमीच्या मिश्किल पद्धतीने ‘अरे मला इतक्या लवकर रिटायर करू नका, मी अजून काम करत आहे. ज्यावेळेस रिटायरमेंट घ्यायची असेल त्यावेळेस मी आपल्याला सांगेलच’ असे म्हणून तो प्रश्न टोलवून लावत असत. मात्र हे फक्त सांगण्यापुरते असते. प्रत्यक्षात राजकीय क्षेत्रात दिग्गज राजकीय नेत्यांना जर आपला राजकीय वारसा चालवण्यासाठी आपल्या नंतर कोणाला राजकारणात उतरायचे असेल तर त्याची सुरुवात, तयारी फार आधीपासून करावी लागते.

आमदार थोरात यांनी आधी असे दोन प्रयत्न करून पाहिले असले तरी हे प्रयत्न फार यशस्वी होताना दिसत नसल्याने त्यांनी आता थेट त्यांची कनिष्ठ कन्या डॉक्टर जयश्री यांना काँग्रेस पक्षाचे पद देऊन राजकारणात आणले आहे. महिलांनी राजकारणात यायलाच हवे. राजकीय क्षेत्रात त्यांना ५० टक्के आरक्षण देखील आहे. महिलांच्या कडून समाजाची एक वेगळी अपेक्षा आहे. महिला संवेदनशील असतात. महिला कार्यक्षम असतात. महिला तत्पर निर्णय घेतात. संघर्ष करण्याचा त्यांचा जन्मजात बाणा असतो आणि विशेष म्हणजे भ्रष्ट कामे करण्यात त्या शक्यतो पुढाकार घेत नाहीत. भ्रष्टाचाराचे प्रमाण देखील महिलांकडून कमी आहे असे चित्र राजकारणात दिसत असल्याने ५० टक्के महिलांनी राजकारण ताब्यात घ्यायला हवे असे माझे मत आहे.

नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आता त्यांचा वारसा चालवत आहेत. त्या आधी शालिनीताईंना संधी मिळालेली आहेच. त्याही राजकारणात आहेत. मधुकर पिचड यांच्या सोबतच त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड (देशमुख) हे देखील राजकीय वारसा चालवत आहेत. काळे कोल्हे, पाचपुते, नागवडे, जगताप आणि आता पवार. सर्वच तालुक्यांमध्ये पाहिले तर एखादा दुसरा अपवाद वगळता नेत्यांनी आपापले राजकीय वारसदार पुढे आणले आहेत.

फक्त संगमनेरचा राजकीय वारसदार पुढे येण्याची वाट अनेक जण पाहत होते. आता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर त्यांची कन्या डॉक्टर जयश्री या थोरात घराण्याचा राजकीय वारसा संगमनेरात चालवणार असून हा वारसा आपले वडील बाळासाहेब थोरात यांच्या प्रमाणेच राज्य नव्हे तर देश पातळीवर सुद्धा पुढे नेणार असल्याची खात्री संगमनेरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

डॉक्टर जयश्री थोरात यांनी पूर्ण ताकतीने आता संगमनेरच्या राजकारणात प्रवेश करावा. त्यांनी राजकीय पदे घ्यावीत. निवडणुकीच्या राजकारणात उतरावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. डॉक्टर जयश्री यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदी नवड झाल्यानंतर संगमनेर शहर आणि तालुक्यातून सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमधून अतिशय उत्साही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. डॉक्टर जयश्री थोरात या प्रत्यक्ष राजकारणात येत असल्याचे चित्र स्पष्टपणे त्यांना दिसू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे. डॉक्टर जयश्री यांच्याबरोबरच थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या शहर आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जे बदल केले आहेत ते सुद्धा अतिशय विचारपूर्वक केले असून युवकांची एक फळीच डॉक्टर जयश्री यांच्यासोबत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार थोरात यांनी नव्या लोकांना संधी द्यावी लागेल असे वक्तव्य केले होते. एकंदरीत थोरात यांनी पुढील राजकीय मनसुबा दाखवला असला तरी डॉक्टर जयश्री या आपल्या राजकीय वारस आहेत हा मुद्दा ते नक्कीच नाकारतील असे मला तरी वाटते.

एवढ्या लगेच ते राजकीय वारसदार आहेत हे जाहीर करणार नाहीत. त्यांची एकंदरीत राजकारणाची शैली पाहता तालुक्याचाच नव्हे तर जिल्ह्याचा अंदाज घेऊन राजकीय वारस ठरवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. कारण आमदार थोरात यांना फक्त संगमनेरच्या राजकारणा पुरते मर्यादित न राहता आता राज्याच्या देशाच्या राजकारणात देखील प्रभावीपणे काम करायचं आहे. राज्याच्या राजकारणात त्यांचा एक दबदबा आहे. राज्याचे राजकारण करताना ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे येणारा वारसा सुद्धा प्रभावी, जनतेच्या मनातला, जनतेला साथ करणारा आणि जनतेची भक्कम साथ मिळवणारा असावा अशी त्याची अपेक्षा असावी असा अंदाज आहे. मात्र लवकरच डॉक्टर जयश्री या ग्रामीण निवडणुकीच्या राजकारणातून जनतेसमोर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

डॉक्टर जयश्री यांनी मागील काही वर्षांपासून संगमनेरात सामाजिक कार्यातून आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. विशेषतः तरुण मुलींची, महिलांची एक चांगली फळी त्यांनी तयार केली आहे. स्वतःच्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तरुणींना एकत्र केले आहे. त्याचबरोबर युवकांमध्ये पण त्यांच्या कार्यपद्धतीची वाहवा केली जाते. ज्येष्ठ, कनिष्ठ सर्वच कार्यकर्त्यांमध्ये वावरताना डॉक्टर जयश्री यांच्या बद्दल नाराजी किंवा तिखट प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत नाहीत. नाराजीच्या प्रतिक्रिया आमदार थोरात यांच्या काही सग्या सोयऱ्यांबाबत ऐकण्यास मिळतात. डॉक्टर जयश्री यांच्या बाबतीत असे घडलेले नाही.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या विकासासाठी उभा केलेला सहकार आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत नेटाने पुढे चालविला. भ्रष्टाचार मुक्त कारभार करणे, सहकाराच्या माध्यमातून विकासाचे आणि सुसंस्कृत राजकारण त्यांनी संगमनेरात रुजवले. प्रामाणिक आणि निष्ठेचे राजकारण, सर्वसामान्यांसाठी कायम तत्पर असल्याची भावना त्यांच्याविषयी नागरिकांच्या मनात आहे. एक स्वच्छ मनाचा दिलदार माणूस अशी प्रतिमा त्यांची निर्माण झाली आहे. तशीच प्रतिमा स्वतःविषयी देखील पुढे नेण्याचे प्रयत्न येणाऱ्या त्यांच्या वारसदारांना करावे लागणार आहेत. त्यात ते यशस्वी होतील की नाही हे पुढे दिसणारच आहे. सध्याची परिस्थिती पाहता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाला संगमनेरात अजिबात धोका नाही. डॉक्टर जयश्री थोरात यांची साथ त्यांना जर मिळाली तर वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांची निवड ही यशस्वी ठरली असल्याचे दिसून येईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!