विखे पाटील झाले महसूल मंत्री —  आता नगर जिल्ह्यातील वाळू माफिया संपणार !

प्रतिनिधी —

नगर जिल्ह्यात होणारी वाळू तस्करी आणि विशेषत: संगमनेर तालुक्यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात होणाऱ्या वाळू तस्करी संदर्भात स्थानिक पातळीपासून ते थेट विधानसभेत आवाज उठवणारे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आता महसूल मंत्री झाल्याने नगर जिल्ह्यातील वाळू तस्करांचा नायनाट होणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत असून विखे पाटलांना महसूल खाते मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नगर जिल्ह्यातील आणि संगमनेर अकोले तालुक्यातील वाहणाऱ्या प्रवरा, मुळा आणि इतर उपनद्यांच्या वाळू तस्करी बाबत नेहमीच चर्चा होत असे. या वाळू तस्करीला महसूल विभागाकडून संरक्षण मिळत असल्याचे आरोप होत असत. त्या वेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वाळू माफिया संदर्भात अनेक वेळा विधानसभेत सवाल उपस्थित केले आहेत. वाळू तस्करांनी या तालुक्यात हैदोस घातला असून महसूल खात्यापेक्षा वाळू तस्कर, वाळू माफिया हे शिरजोर झाले असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला होता.

त्यावेळी संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री पदावर विराजमान होते. विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि वाळू तस्करी तसेच गौण खनिज तस्करीवर देखील आवाज उठवला होता. त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे त्यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते. वाळू तस्करी थांबली नसल्याचा आरोप त्यांनी वेळोवेळी केला होता हा सर्व विषय नेहमीच ऐरणीवर होता.

आता शिंदे सरकार मध्ये दस्तूर खुद्द राधाकृष्ण विखे पाटील हेच महसूल मंत्री झाल्याने नगर जिल्ह्यातील विशेषत: संगमनेर – अकोले तालुक्यातील वाळू तस्करीला पूर्णपणे आळा बसणार आहे. विखे पाटील हे वाळू माफियांचा कर्दनकाळ ठरतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर संगमनेर सह नगर जिल्ह्यातील वाळू तस्करी, गौण खनिज तस्करी, पाळू माफियांचा नायनाट करावा अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.

तसेच नगर जिल्ह्यातील महसूल व प्रशासनात वाळू तस्करांना समर्थन करणारे व वेळोवेळी वाळू तस्करांना पाठीशी घालणाऱ्या तलाठ्यांपासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या कार्यालयातील वाळू तस्करांच्या छुप्या समर्थकांवर कारवाई केली जावी अशी ही मागणी जनतेकडून होत आहे. आता वाळू तस्करांवर काय कारवाई होते याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!