नेत्यांच्या होतात राजकीय कुरघोड्या अन् कार्यकर्त्यांच्या मात्र पोलीस स्टेशनच्या वाऱ्या !!

सोशल मीडिया झाला काड्या करण्याचे हत्यार !

बड्या नेत्यांनी आता प्रेम प्रकरणे जुळवणे, लफडी जुळवणे – मोडणे, सोयरीकी जुळवणे – मोडणे एवढे एकच क्षेत्र बाकी ठेवले आहे.

विशेष प्रतिनिधी —

राजकारणा पायी संगमनेर तालुक्यात एकमेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा पडू नये अशा प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. संगमनेर तालुक्यातील काही गावे राहाता आणि अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडली गेल्याने असे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा मतदारसंघ आणि तालुके एकमेकात मिसळलेले असल्याने अगदी किरकोळ समस्यांपासून ते राजकीय भांडणांपर्यंत आणि निवडणुकांच्या राजकारणात सुद्धा एकमेकांच्या मतदारसंघात आणि तालुक्यात हस्तक्षेप करण्याची स्पर्धा नेत्यांमध्ये लागलेली आहे. काही झाले तरी एकमेकांच्या मतदार संघात नाक खुपसायचे आणि वाद कसे वाढतील याला खतपाणी घालायचे असे प्रकार होऊ लागले आहेत.


या राजकीय खेळ्यांपायी कुठलेही आंदोलन असो मग ते सामाजिक आंदोलन असो, राजकीय आंदोलन असो, पाण्याचा प्रश्न असो, प्रदूषित पाण्याचा प्रश्न असो, जिल्ह्याचा प्रश्न असो, अगदी सोसायट्या, ग्रामपंचायत निवडणुकांचा असो, अगदी किरकोळ सर्वच बाबतीत एकमेकांच्या कार्यक्षेत्रात जाऊन नाक खुपसण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा भांडणांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. सोशल मीडिया तर काड्या करण्याचे एक हत्यार म्हणून वापरले जातो. याने नेत्यांचे मात्र काहीच नुकसान झालेले दिसत नाही. कार्यकर्त्यांच्या मात्र पोलीस स्टेशनच्या वाऱ्या वाढल्या आहेत. एकमेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कार्यकर्ते बिचारे न्यायालयात, पोलीस स्टेशनला हेलपाटे मारत आहेत.

अलीकडच्या काळात राज्यभरात राजकीय विरोधकांची जिरवण्यासाठी सत्ताधारी मंडळींकडून सत्तेचा गैरवापर करीत विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ही प्रथा संपूर्ण देशभर पसरली आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे.

राजकारणाचा विरोध हा चांगल्या मूल्यांवर आधारित असावा आणि सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांचे म्हणणे समजून घ्यायला हवे असा भारताचा इतिहास असताना देखील आता राजकारणात एकमेकांची जिरवण्यासाठी एकमेकाविरुद्ध खोट्या तक्रारी करून खोटे गुन्हे दाखल करण्याची चढाओढ राजकीय पुढार्‍यांमध्ये त्यांच्या चमच्यांमध्ये, बगलबच्च्यां मध्ये सुरू झाली असून यात काही पत्रकार देखील सहभागी होऊ लागल्याने अशा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रथा वाढीस लागल्या आहेत.

महिलांना पुढे करून खोटे गुन्हे दाखल करणे, धमक्या, हाणामारी, शिवीगाळ, दमदाटी, अपहरण, जातीयवादी घटना याचा राजकीय वापर करणे. अगदी धार्मिक मिरवणुका, राष्ट्रपुरुषांच्या मिरवणुकादेखील अशा अनेक प्रकारच्या खोट्या तक्रारीं मधून सुटलेल्या नाहीत. एकमेकांविरुद्ध खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे दाखल करून एकमेकांना राजकीय जीवनातून उठवण्याचे देखील प्रयत्न झाल्याचे आपण पाहत आहोत. यात काही पत्रकार देखील सामील झाल्याचे चित्र असल्याने हे चित्र फारच विदारक आहे. पत्रकार आता राजकीय पुढार्‍यांसारखे वागू लागल्याचे दिसते.
संगमनेर तालुका हा सुसंस्कृत राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. येथील राजकारण सुसंस्कृत असल्याचा दावा नेहमीच केला गेलेला आहे. बाहेरची मंडळी येऊन येथील राजकीय वातावरण बिघडवत असल्याचे आरोप देखील झालेले आहेत. संगमनेरातील राजकारण खरच सुसंस्कृत राहिले आहे काय याचा शोध आता घ्यावा लागणार आहे.
त्यासाठी पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि इतर प्रशासकीय यंत्रणांचा वापर कशा पद्धतीने होतो. तो कसा केला जातो. सत्तेचा दबाव त्यांच्यावर कसा असतो. याबाबत सुद्धा सखोल माहिती गोळा करावी लागणार आहे.

विशेषत: पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी हे राजकीय पुढार्‍यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे बाहुले म्हणूनच काम करताना दिसतात. हे बाहुले पुढारी जसे पाहिजे तसे आपल्या बाजूने खेळवत असतात. सर्वसामान्य माणसांना मात्र पोलिसांकडून प्रशासनाकडून कुठलाही न्याय मिळत नाही असे चित्र संगमनेर, अकोले, राहाता तालुक्यात तर नक्कीच असल्याची चर्चा नेहमीच होते.
या भागांमध्ये शहर, तालुका ग्रामीण भाग या सर्व ठिकाणी पोलिसांविषयी नाराजीचा सुर नेहमीच ऐकण्यास मिळतो. महसूल प्रशासन आणि इतर प्रशासकीय कार्यालयांबाबत देखील अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.

एकमेकांचे राजकीय वैरी असणारे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय वैर असल्याचे भासवणारे लोकप्रतिनिधी आपल्या राजकारणासाठी अशा खोट्या तक्रारींचा वापर करून कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावून देण्याचे काम मात्र जोमाने करत असतात. या राजकीय खेळ्या करणारे हे नेते काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. हे सर्व सामान्य कार्यकर्ता ज्या दिवशी ओळखेल त्या दिवशी कार्यकर्त्यांसाठी तो सुदिन म्हणून ओळखला जाईल.

कार्यकर्त्यांचा वापर स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी होतो. हे संगमनेर तालुक्याने अनुभवलेले आहे. संगमनेर तालुक्यात बाहेरून येणारे नेते, स्थानिक नेते व इतर नेत्यांच्या आपापसातील कुरघोड्यांमुळे गुन्हे मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर दाखल होताना दिसतात. असा अनुभव इतर तालुक्यांचा देखील आहे. राजकीय पुढार्‍यांना, सत्ताधाऱ्यांना मात्र त्याचा कुठलाही त्रास झालेला दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही सत्य बाब कोणताही नेता नाकारू शकत नाही. एकमेकांविरुद्ध फक्त ‘बोल बच्चनगिरी’ करणे एवढेच या तथाकथित महान नेत्यांचे काम आहे. आणि त्यातून कार्यकर्त्यांची भांडणे लावून कार्यकर्त्यांना कायम आपल्या दावणीला बांधून ठेवणे हाच एक त्या मागचा उद्देश आहे.
एकंदरीत संगमनेर, अकोले, राहाता तालुकाच काय नगर जिल्ह्यात एकमेकांच्या विरोधात कायम आरडा ओरडा करणारे नेते यांनी एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले चित्र अद्याप तरी पाहायला मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी यावरून जो काही बोध घ्यायचा असेल तो घ्यावा…

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!