संगमनेरातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ! काय गौडबंगाल आहे ?
”मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली” असे व्हायला नको !!
विशेष प्रतिनिधी —
अधिकाऱ्यांची तातडीने बदली होते. मात्र नवीन अधिकारी येण्यासाठी वेळ लागतो. नेमकी काय भानगड आहे. नवीन अधिकारी येण्यास घाबरतात अशी एक चर्चा आहे. तर दुसरीकडे नवीन अधिकाऱ्याचा मनासारखा सौदा होत नसल्याचे बोलले जात आहे. बदल्या मागचा पैसा यास कारणीभूत असल्याची चर्चा देखील वेळोवेळी होते. बदल्यांसाठी घेतलेले पैसे परत करावे लागतील अशा प्रकारचे आरोप देखील नगर जिल्ह्यात झालेले आहेत. आता नेमके कोण कोण बदल्यांसाठी पैसे घेतात. कोणी पैसे घेतले आहेत. यापूर्वी देखील मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पैसे घेतले आहेत का ? आता कोण घेणार आहेत ? याबाबतचा संबंधांनी खुलासा केला म्हणजे बरे होईल. 
नाहीतर नवीन बदल्यांमध्ये “मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली” असा प्रकार जनतेसमोर यायला नको.

संगमनेर तालुक्यात प्रशासन आणि पोलीस खात्यांमध्ये बदलून येण्यासाठी अधिकारी घाबरत आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वादाच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा आपली दुसरीकडे शांतपणे नोकरी केलेली बरी अशी मानसिकता संगमनेर मध्ये बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांची झाली असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

भौगोलिक क्षेत्राने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यातील काही गावे अकोले विधानसभा मतदारसंघाला आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे या तालुक्याला तीन तीन आमदार आहेत. त्यातच पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे देखील संगमनेरचेच आहेत. त्यामुळे संगमनेर वर चार आमदारांचे वर्चस्व असते. मात्र या ठिकाणी थोरात हेच सबकुछ असल्याचे चित्र सध्यातरी आहे.
तरीही प्रशासकीय खात्यातील अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी आणि राज्य शासनाच्या इतर इतर सरकारी, नीमसरकारी संस्थांमध्ये अधिकारी या चारीही आमदारांच्या दबावाखाली वावरत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. थोरात – विखे यांचा राजकीय वाद पारंपारिक आहे. या वादाचे परिणाम अधिकाऱ्यांना वेळोवेळी भोवले आहेत. कुणाचे ऐकावे, कोणाचे ऐकू नये अशा मनस्थितीत अधिकारी असतात.
विशेष म्हणजे अधिकारी देखील संविधान आणि कायद्याने चालत नसल्याने त्यांना या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादावरच आपले काम भागवावे लागत असल्याचे आरोप त्यांच्यावर नेहमीच होतात. अधिकाऱ्यांनी जर नियमाप्रमाणे आणि संविधानाला स्मरून आणि संविधाप्रमाणेच काम केले तर अधिकाऱ्यांवर कुठलाही नेता कुठलीही कारवाई करू शकत नाही. दबाव सुद्धा आणू शकत नाही. मात्र संगमनेर तालुक्यात चालणाऱ्या विविध अवैध व्यवसायामुळे अधिकारी नेहमीच बदनाम झालेले आहेत.
संगमनेरातली गौण खनिज तस्करी, दगड खाणी, बेकायदेशीर उत्खनन, वाळू तस्करी, बेकायदेशीर गोवंश हत्या करणारे कत्तलखाने, नगर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले मटका आणि जुगार अड्डे, गांजा तस्करी, गुटखा तस्करी या सर्व प्रकारामुळे संगमनेर पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे ‘मलिदा’ मिळत असल्याच्या चर्चा नेहमीच होतात आणि या मलिद्याचा देखील या अधिकाऱ्यांवर दबाव असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना तोंड दाबून बूक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
अर्थात हे सर्व अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर, कार्यशैलीवर अवलंबून आहे. कोणता दबाव घ्यायचा. कोणता दबाव झुगारायचा आणि जनतेची सेवा कशी करायची आणि आपापल्या खात्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम कसे करायचे यावर अधिकारी ठामपणे आणि विश्वासाने काम करत राहिले तर अधिकाऱ्यांना कोणतीच  अडचण येणार नाही. मात्र तसे होताना दिसत नाही.
राज्यातील सरकार बदलल्यानंतर महसूल मंत्री पद विखे पाटलांकडे आले. त्यानंतर लगेचच थोड्या दिवसात संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची देखील बदली करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी अधिकारी रुजू करण्यात आलेले नाहीत. प्रभारी अधिकाऱ्यांवरच कारभार चालू आहे. आता महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची किंवा बदलीची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे. विखे पाटलांनी तसा इशारा दिला असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
एखाद्या वादग्रस्त अधिकाऱ्याच्या बदली बाबत सर्वसामान्य जनतेने कितीही आंदोलने केली, निवेदनेही दिली, तक्रारी केल्या, उपोषण केले तरीही त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही. अधिकारी आपल्या जागेवर आरामशीर काम करत असतात. मात्र एखाद्या मंत्र्याने, आमदाराने, खासदाराने, भांडवलदाराने ‘व्यक्तिगत इंटरेस्ट’ घेतला की अधिकाऱ्याची बदली होते. आहे की नाही गंमत. नगर जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे आहेत.
अधिकाऱ्यांची तातडीने बदली होते. मात्र नवीन अधिकारी येण्यासाठी वेळ लागतो. नेमकी काय भानगड आहे. नवीन अधिकारी येण्यास घाबरतात अशी एक चर्चा आहे. तर दुसरीकडे नवीन अधिकाऱ्याचा सौदा होत नसल्याचे बोलले जात आहे. बदल्यान मागचा पैसा यास कारणीभूत असल्याची चर्चा देखील वेळोवेळी होते. बदल्यांसाठी घेतलेले पैसे परत करावे लागतील अशा प्रकारचे आरोप देखील नगर जिल्ह्यात झालेले आहेत. आता नेमके कोण कोण बदलांसाठी पैसे घेतात. कोणी पैसे घेतले आहेत. यापूर्वी देखील मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पैसे घेतले आहेत का ? आता कोण घेणार आहेत ? याबाबतचा संबंधांनी खुलासा केला म्हणजे बरे होईल.
नाहीतर नवीन बदल्यांमध्ये “मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली” असा प्रकार जनतेसमोर यायला नको.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!