संगमनेरात विधवा महिलांनी हळदी कुंकू लावत वटपौर्णिमा केली साजरी !

माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रोहिणी गुंजाळ यांचा पुढाकार

प्रतिनिधी –

 

पुरोगामी विचारांच्या चळवळीतील अग्रणी असलेल्या संगमनेर मध्ये नेहमीच परिवर्तनाच्या दिशेने काम करण्यात सर्व समाज आणि पक्ष आघाडीवर असतात.

संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि पंचायत समितीच्या माजी सदस्या रोहिणी गुंजाळ यांनी या चळवळीत एक पाऊल पुढे टाकत वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने विधवा महिलांना हळदीकुंकू लावत वटपौर्णिमेच्या वड पूजेचा उपक्रम विधवा महिलांच्या हस्ते साजरा केला.

जुन्या परंपरा मोडीत काढीत विधवा महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत आणि अभिनंदन होत आहे.

वटपौर्णिमेच्या निमित्ताने संगमनेर खुर्द या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला या उपक्रमात अमृतवाहिनीशेती व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख येथील सक्रिय सहभागी झाल्या होत्या.

वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी या भागातील विविध विधवा महिलांना सन्मानाने वटवृक्षाखाली बोलावून त्यांना हळदी-कुंकू व  टिकली लावत त्यांचे स्वागत करून परंपरेप्रमाणे या महिलांसोबत सौभाग्यवती महिलांनी देखील वडाला फेऱ्या मारून, विधिवत पूजा करून वृक्ष संगोपनाचे कार्य हाती घेण्याची शपथ घेतली.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने नुकतेच विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेऊन महाराष्ट्र मध्ये आदर्श घालून दिला आहे. विधवा प्रथा बंद राहाव्यात यासाठी शासनाने देखील पुढाकार घेतला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात नेहमीच परिवर्तनसुरु असते. संगमनेरने देखील पुढाकार घेत निदान पारंपारिक सण उत्सवां मध्ये विधवा महिलांना सहभागी करून घेत प्रथा परंपरा मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे.

पूर्वीच्या काळी विधवा महिलांना इच्छा नसतानाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. प्रथा सांभाळाव्या लागत होत्या. त्याकाळी पतीच्या निधनानंतर पत्नीचे केशवपन केले जायचे.(मुंडन केले जायचे) बांगड्या फोडल्या जायच्या, कपाळावरचे कुंकू पुसले जायचे, गळ्यातले मंगळसूत्रकाढून टाकण्यात येत होते. विधवा महिलेला कुठल्याच कार्यक्रमात प्रवेश  नव्हता. सामाजिक कार्यात देखीलखील त्यांनासहभागी करून घेत नसत.अशा अत्यंत  कठीण परिस्थितीतून महाराष्ट्रातल्या समाज सुधाकरकांनी अशा प्रथा बंद करण्यात पुढाकार घेतला. तोच आदर्श घेत आम्ही आता ही सुरुवात केली आहे.

दुर्गा तांबे, माजी नगराध्यक्षा, संगमनेर 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!