रक्तदाता आणि ज्ञानदाता दोघेही समाजासाठी उपकारक — सुनीता मालपाणी

उद्योगपती दामोदर मालपाणी यांच्या स्मृतीदिना निमित्त ९३ रक्तपिशव्यांचे संकलन
प्रतिनिधी —
रक्तदाता आणि ज्ञानदाता हे दोन्हीही घटक समाजासाठी अतिशय उपकारक आहेत. दिल्याने वाढते याचा सुंदर अनुभव रक्त आणि ज्ञान देणार्यांना मिळतो. सामाजिक भावनेतून केलेले कृत्य नेहमीच सत्कारणी लागते. रक्तादानाला तर जगात सर्वश्रेष्ठ दान समजले जाते, आपल्या दातृत्त्वातून एखाद्या रुग्णाचा जीव वाचावा यापेक्षा मोठे पुण्यकर्म कोणते असू शकेल ? ज्याप्रमाणे ज्ञानाचा साठा दिल्याने वाढतो, तसाच शरीरातील रक्ताचा साठाही वाढतो. त्यामुळे रक्तदाता आणि ज्ञानदाता दोघेही समाजासाठी उपकारक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मालपाणी यांनी केले.

उद्योगपती (स्व) दामोदर मालपाणी यांच्या ४७ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त मालपाणी उद्योग समूहाने अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने आपल्या कर्मचारी व कामगारांसाठी शुक्रवारी (ता.१७) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर सोनिया मालपाणी, प्रफुल्ल खिंवसरा, व्यवस्थापक रमेश घोलप, शिवाजी आहेर, देवदत्त सोमवंशी, रवींद्र कानडे, प्रदीप कानवडे, अर्पण रक्तपेढी संचालक डॉ.नयन जैन, डॉ.रोहिणी काकड व प्रमिला कडलग आदी उपस्थित होते.

मालपाणी म्हणाल्या की, रक्तदान म्हणजे जीवदान देण्यासोबतच नाते जोडणारे अनोखे दान आहे. भारतीय संस्कृतीत दान या संकल्पनेस खूप महत्व देण्यात आले आहे. त्यापैकी रक्तदानाला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. रक्तदानात रुग्णाला संजीवनी देण्याचे सामर्थ्य तर आहेच पण त्यासोबतच नाते जोडण्याची अद्भुत किमयाही त्याच्या अंगी आहे. ज्याप्रमाणे ज्ञानदानाने मन निरोगी, शांत, समाधानी व समृध्द होते त्याप्रमाणे रक्तदानाने शरीर निरोगी व सुदृढ होण्यास मदत होते असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

यावेळी सोनिया मालपाणी यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देतांना देशभरात दररोज होणारे असंख्य अपघात आणि त्यातून केवळ रक्त न मिळाल्याने जीव जाणार्यांची संख्या यावर अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. कारखाना व्यवस्थापक रमेश घोलप यांनी प्रास्तविकात या उपक्रमातून मालपाणी उद्योग समूह सातत्यपूर्ण पद्धतीने समाजसेवेचा वारसा चलावत असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या अव्याहत उपक्रमात यावर्षी ९३ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. संतोष राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

