असंघटित कामगारांना साहित्य संचचे वाटप !
यशोधन कार्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी —
विधिमंडळ पक्ष नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विविध योजनांचा लाभ गोरगरीब नागरिकांना मिळत असतो. यशोधन कार्यालयामार्फत तालुक्यातील असंघटित कामगारांची मोठ्याप्रमाणावर नोंदणी करण्यात आली असून संगमनेर तालुक्यातील १ हजार ५०० असंघटित कामगारांना साहित्य संचाचे वाटप डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील कोल्हेवाडी, गुंजाळवाडी, नान्नज दुमाला, रायते, वाघापूर, जोर्वे यांसह विविध गावांमध्ये साहित्य संचचे वाटप करण्यात आले. यावेळी कोल्हेवाडी येथे इंद्रजीत थोरात, असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, डॉ.तुषार दिघे, अशोकराव दिघे, बाबासाहेब वामन, राजेंद्र दिघे, विठ्ठल खुळे, विलास दिघे, बाबासाहेब खुळे, शिवाजी खुळे तर गुंजाळवाडी येथे नवनाथ अरगडे, सरपंच वंदना गुंजाळ, उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, अमोल गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ, नयना रहाणे, अंबादास गुंजाळ, संपतराव गुंजाळ, विस्तार अधिकारी कासार आदी उपस्थित होते.

या साहित्य किट मध्ये लोखंडी पत्र्याची पेटी, जेवणाचा डबा, चटई, हॅन्ड ग्लोज, सेफ्टी गॉगल, हेल्मेट यांसह वीस प्रकारचे साहित्य देण्यात आले.
यावेळी डॉ.थोरात म्हणाल्या की, तालुक्यातील जनतेसाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. त्यापैकी असंघटित कामगारांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी व त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नासाठी राज्य सरकार भरीव मदत करत आहे. ती मिळवून देण्याचे काम यशोधन कार्यालयामार्फत केले जात आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी, कामगारांसाठी यशोधन कार्यालयात २४ तास काम केले जात आहे. तसेच तालुक्यातील गावागावांमध्ये अनेक विकास कामे सातत्याने सुरू आहेत. असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारची ही योजना अतिशय उत्तम असून या योजनेचा लाभ असंघटीत कामगाराने घेतला पाहिजे व अडचण असेल तर यशोधन कार्यालयाशी कामगारांनी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, उपसभापती नवनाथ अरगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील गावांतील असंघटित कामगार, कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
