बालेकिल्ल्यात विखे पाटलांना जोरदार धक्का !
सोसायटीच्या निवडणुकीत पराभव

कनोलीत विखे गट भुईसपाट, तर आश्वीमध्ये जोरदार धक्का
राजकीय बुरूज ढासळण्यास सुरुवात झाल्याची चर्चा…
प्रतिनिधी —
स्वतःच्या लोणी खुर्द गावात धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या शिर्डी विधानसभा मतदार संघातील संगमनेर तालुक्यातील गावां मध्ये महत्त्वाच्या सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये देखील पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसत असून संगमनेर तालुक्यातील विखे पाटील यांचे राजकीय बुरुज ढासळत असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी लोणी खुर्द येथील ग्रामपंचायतीमध्ये पराभव झाल्यानंतर सोसायटीमध्ये देखील विखे-पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.
त्यानंतर शिर्डी मतदार संघात असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील गावांपैकी कनोली या गावात देखील विखे यांच्या गटाचा पूर्ण पराभव झाला तर आश्वी येथे सुद्धा थोरात गटाने मोठ्याप्रमाणावर बाजी मारत विखे यांच्या राजकीय गटाला धक्का दिला आहे.

सहकारातून समृद्धी निर्माण करणाऱ्या संगमनेर तालुक्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध सेवा सोसायट्या बिनविरोध झाल्या असून सर्व सेवा सोसायटींवर थोरात गटाची सत्ता आहे. विखें यांच्या मतदारसंघात असलेल्या कनोली सेवा सोसायटीवर नामदार थोरात गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून आश्वी मध्ये विखे गटाला जोरदार टक्कर दिली आहे.

कनोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाने दणदणीत विजय मिळवत १३ /० ने विखे गटाचा धुव्वा उडवला आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून – काशीराम वर्पे, प्रकाश वर्पे,बंडू वर्पे, भाऊसाहेब वर्पे, राजेंद्र वर्पे,सतीश वर्पे, संजय वर्पे, संदीप वाबळे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून – फॉर्मस रामचंद्र जगताप, इतर मागासवर्गीय प्रवर्ग मधून – सुभाष हौशीराम वर्पे, महिला राखीव मधून – सुमन वर्पे, संगीता वर्पे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून – ईश्वर रामचंद्र पवार हे विजयी झाले आहेत.

तर आश्वी मध्ये अमरेश्वर मंडळाने विखे गटाला जोरदार टक्कर दिली असून अमरेश्वर मंडळाचे ६ व जनसेवा मंडळाची ६ उमेदवार विजयी झाले. सातव्या उमेदवाराचे मत समान झाल्याने त्यावर चिठ्ठी टाकण्यात आली. चिठ्ठी वरून विखे गटाचे उमेदवार विजयी झाले. मात्र या निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या लढती मध्ये अमरेश्वर मंडळाने विखे गटाला जबरदस्त हादरा दिला आहे.

युवक कार्यकर्ते विजय हिंगे म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमरेश्वर मंडळाने अत्यंत पारदर्शक कामातून सभासदांमध्ये मोठा विश्वास निर्माण केला आहे. आश्वी व परिसरातील जनताही नामदार थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून आगामी काळामध्ये निवडणुकीपुरते समाजकारण व राजकारण न करता सातत्याने विकास कामांना प्राधान्य देऊन जनतेचे प्रश्न सोडवले जाईल असे ते म्हणाले.

या सर्व विजयी उमेदवारांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे, संचालक गणपत सांगळे, विजय हिंगे, तालुका विकास अधिकारी रमेश थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.
दुसरीकडे विखे पाटील यांच्या लोणी खुर्द या गावात यापूर्वीच ग्रामपंचायतीवर विरोधकांनी पूर्णपणे ताबा मिळवलेला आहे. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये देखील विखे गटाचा याठिकाणी दारुण पराभव करण्यात आला आहे. या सर्व राजकीय घडामोडी पाहता विखे पाटलांची लोणी या बालेकिल्ल्यात त्यांना जबर धक्का देण्यात आला असून संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघातील राजकीय बुरुज ढासळत असल्याचे देखील बोलले जात आहे.
