अगस्ती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी — मधुकर पिचड यांचे आवाहन

तालुक्याची भाग्यलक्ष्मी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे
अगस्तीचे हित जोपासण्यासाठी एक पाऊल मागे येण्यास तयार
प्रतिनिधी —
अगस्ती साखर कारखाना ही अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे. ती टिकली पाहिजे, याकरीता आपण यापुर्वीपासून सर्वांना बरोबर घेत निवडणूक बिनविरोध करण्याची जी प्रथा पाडली आहे, तीच पुढे नेण्याची आपली भूमिका असुन अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची होणारी निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, कारखान्याचे सभासद यांना राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी केले आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिचड यांनी एक प्रसिद्धिपत्रक काढून आपली भुमिका जाहीर केली.
यामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, साखर कारखान्याची निर्मिती केल्याचा आपल्याला आनंद आहे. निर्मितीचा जो आनंद असतो तो कशातच नाही. कारखान्याने तालुक्यातील शेतकर्यांच्या ऊसाला नेहमीच जादा भाव देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे. किंबहूना एफआरपी पेक्षाही जास्त भाव दिला आहे. साखरे बरोबरच इतर उपपदार्थ निर्मितीसाठी इथेनॉल प्रकल्प उभारला. हा कारखाना टिकावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलो.

दरम्यानच्या काळात कारखाना बंद पडला. या काळात कामगार व शेतकर्यांचे मोठे नूकसान तरझालेच पण जे नुकसान झाले त्यामुळे आपण खूपच मागे गेलो होतो. बंद पडलेला कारखाना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपण चालू केला. तेव्हा आपण सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संचालक मंडळात प्रतिनिधीत्व देत एक नवी प्रथा पाडली.

आज राज्यात देशात अनेक कारखाने फक्त नावाला सहकारी आहेत पण प्रत्यक्षात ते काहींच्या मालकीचे आहेत हे मी सांगायला नको. अत्यंत लोकशाही मार्गाने आपण कारखाना चालविला. अगस्ति हा खर्या अर्थाने सभासदांच्या मालकीचा आहे. हा सभासदांच्याच मालकीचा रहावा हीच आपली प्रामाणिक भूमिका आहे. कारखान्यात आपण कधीराजकारण आणले नाही. त्याकडे कधी आपण राजकीय दृष्टीकोणातून पाहिले नाही.

जेव्हा केव्हा अगस्ति कारखाना अडचणीत आला तेव्हा तेव्हा आपण त्यातून सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढला आहे. अगस्ति कारखाना ही खर्या अर्थाने भाग्यलक्ष्मी आहे. तीच्यावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. अनेकांच्या चूली पेटतात. आज तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकणार्या ऊसाला त्यामुळे जागेवरच बाजारपेठ निर्माण झाली. कारखान्याच्या निर्मितीमागचा आपला उद्देशच हा होता की, शेतकर्यांचे हाल होऊ नये. तोच अगस्ती आजपर्यंत आपण चालविला यापुढे देखील सर्वांच्या मदतीने तो आत्मविश्वासाने चालवू यात तिळमात्र शंका नाही.

राजकीय संघर्ष जेव्हा जेव्हा होतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम कारखान्यावर संस्थेवर होतात हे आपण यापुर्वी पाहिले. तेव्हा कारखान्याकडे राजकारण म्हणून न पाहता त्याकडे एक भाग्यलक्ष्मी म्हणून सर्वांनी पहावे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, आपण याबाबद नेहमीच कारखान्याच्या वार्षिक सभांमधुनही ही भूमिका जाहीर केली असून आजही आपली तीच भूमिका आहे.

राजकारणाच्या पातळीवर राजकारण जरुर कर. पण कारखान्यात राजकरण करणार नाही. अगस्तीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी यापुर्वी जसे आपण एकत्र आलो, बैठका घेतल्या तसे एकत्र बसू आणिसर्वसमावेशक संचालक मंडळ देऊ. अगदी माघारीपर्यंत आपली कुणाशीही चर्चा करण्याची भूमिका आहे. अगस्ती कारखाना ही तालुक्याची शिखर संस्था असून तीचे हित जोपासण्यासाठी आपली एक पाऊल मागे येण्याची देखील तयारी असून कारखान्याचे सभासद कर्मचारी यांचे हित आपल्याला महत्वाचे वाटते. ते जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन पिचड यांनी केले आहे.
