संगमनेरात हुक्का पार्टी कॅफेवर पोलिसांचा छापा !
तरुणांना ताब्यात घेऊन कारवाईनंतर सोडले

प्रतिनिधी —
संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने गुंजाळवाडी शिवारातील एका ‘कॅफे हाऊस’वर छापा घालीत चालकासह काही जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत सापडलेले बहुतेक हुक्काप्रेमी शहरातील महाविद्यालयीन तरुण असल्याने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

पंकज सुभाष शिंदे, मयूर बाळासाहेब काळे, श्रेयस दत्तात्रय काळे, श्रवण श्रीराम नावंदर, रोशन रावसाहेब वाबळे, आदेश नितीन गुंजाळ, शुभम राजेंद्र लगे, आकाश रवींद्र तवरेज, शुभम दत्तात्रय काळे, ऋतिक बाळासाहेब काळे सर्व राहणार संगमनेर शहर या तरुणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले आहे. पुढील कारवाई न्यायालयात होणार आहे.

सदरची कारवाई रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी रस्त्यावरील ‘दि सिक्रेट पॅराडाईस कॅफे’ या ठिकाणावर करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तेथे छापा घातला असता सदर कॅफेच्या वरच्या मजल्यावर शासनाने बंदी घातलेला हुक्का पितांना महाविद्यालयीन तरुण आढळले. तेथील सामानाची तपासणी केली असता पोलिसांना मानवी जीवितास धोका होऊ शकेल असे हुक्का पिण्याचे सामान व त्यात मिसळण्यासाठीचे वेगवेगळे फ्लेवर्स आढळून आल्याचे दाखल तक्रारीत म्हंटले आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई कानिफनाथ जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दि सिक्रेट पॅराडाईज कॅफेचा चालक पंकज सुभाष शिंदे याच्यासह वरील महाविद्यालयीन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईत ३८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन उगले हे करत आहेत.
