निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा अडचणीत !

दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांना आदेश !
प्रतिनिधी —
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने अडचणीत आले आहेत.
पिंपरी चिंचवड मधील दोन दिव्यांग व्यक्तींनी केलेल्या तक्रारीची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची चौकशी करावी तसेच दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा असे आदेश अकोला पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.

प्रहार संघटनेचे राजेंद्र वाकचौरे आणि दत्तात्रय भोसले या दिव्यांगानी तक्रार केली आहे. अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी ‘माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यु ट्युब विविध वाहिन्यांवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतात’ असे म्हटल्याचे वाकचौरे आणि भोसले यांचे म्हणणे आहे. तसे निवेदन आणि तक्रार त्यांनी दिव्यांग आयुक्तांकडे केली आहे.
इंदुरीकर यांच्या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी वाकचौरे आणि भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्याची दखल घेतली. त्यानुसार त्यांनी अकोला पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून याची चौकशी करावी, अशी सूचना पोलिस अधीक्षकांना केली आहे. दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२ (अ) नुसार त्वरित गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला आहे.
