भल्या पहाटे संगमनेरात तीन वाहने जाळली !
गाड्या पेटवण्याची ही दुसरी घटना
प्रतिनिधी —
आज पहाटेच्या सुमारास संगमनेर शहरातील घोडेकर मळ्याच्या परिसरासह जेधे कॉलनीत घरा समोर उभ्या असलेल्या एका रिक्षासह दोन मोटारसायकल जाळून टाकण्याची घटना घडली आहे. यात एक दुचाकी आगीत पूर्ण जळाली असून रिक्षासह दुसऱ्या मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

असाच प्रकार गेल्या वर्षी अभंग मळ्यातील सामाजिक कार्यकर्ते संपत गलांडे यांच्या गाड्या जाळण्याच्या बाबत घडला होता. या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसताना आता हा दुसरा प्रकार घडला आहे. यामुळे अशा गाड्या जाळण्याच्या घटनांचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सदरची घटना आज शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याचा सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर घडली आहे. याबाबत घोडेकर मळ्यात राहणार्या जय तपेंद्रबहाद्दूर सुनार यांनी अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर उभी असलेली त्यांची ज्युपीटर मोटार सायकल (क्र.एमच.एच.१७/सी.एल.७२४२) कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. सदरची गोष्ट पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या लक्षात आली. ही दुचाकी पूर्ण जळून खाक झाली आहे.

दुसरी घटना घोडेकर मळा पासून जवळच असलेल्या पवार हॉस्पिटल पाशी घडली आहे येथे राहणाऱ्या कपिल दिलीप शिंदे यांची रिक्षाही पेटवून देण्यात आली आहे यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे दुसरी घटना जेधे कॉलनी येथे घडली असून आकाश बाळू जेधे यांची घराच्या दारासमोर उभी असलेली पल्सर मोटर सायकल (एम एच १७ बी डब्ल्यू ४८२४) हेसुद्धा पेटवून देण्यात आली. दोन्ही दुचाकी यांचे मोठे नुकसान झाले आहे.एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक विजय खाडे हे करीत आहेत.
