वाळू आणि गौण खनिज तस्करी करणाऱ्या गुंडांनी मंडळ अधिकाऱ्याला बदडले !

संग्रहित छायाचित्र
महसूल अधिकाऱ्यांचे मौन ; महसूलमंत्र्यांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी —
महसूल मंत्र्यांच्या संगमनेर तालुक्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांकडून आणि गुंडांकडून महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता एका मद्यधुंद तलाठ्याला मारहाण झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

संगमनेर तालुक्यातील वाळू तस्करी हा ऐरणीवरचा विषय असला तरी याकडे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार हे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने वाळू तस्करी आणि गौण खनिजाच्या तस्करी मध्ये नेहमीच वाढ होताना दिसते. यातून अनेक गुन्हे घडतात. गुन्हे घडले आहेत.
यापूर्वी वाळू तस्करी करण्यासाठी चक्क मुळा नदीच्या पात्रात वाळू तस्करांनी रात्रीतून बंधारा घालून पूल तयार केला होता. हा पूल महसूल खात्याला नंतर बुलडोजर च्या साह्याने तोडावा लागला आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागले.

संगमनेर तालुक्याला महसूल मंत्री पद असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाडस होते. ते कशामुळे होते ? कोणामुळे होते ? हे आता सर्वश्रुत झाले आहे. महसूल प्रशासनाचा कुठलाही दबाव गौण खनिज तस्करी करणाऱ्या, वाळू तस्करी करणाऱ्या गुंडांवर राहिलेला नाही. यामागे राजकीय आशीर्वाद असल्याचीही चर्चा नेहमीच होते. त्यामुळे वाळू तस्करांचा हैदोस सुरूच आहे.

घाटामध्ये एका डंपर मधून गौण खनिजाची तस्करी होत असताना मंडळ अधिकाऱ्याने तो डंपर पकडला. त्या मंडळ अधिकाऱ्याला तस्करी करणाऱ्या गुंडांनी बेदम मारहाण केली. अगदी जमिनीवर पाडून, खाली लोळवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण एवढी जबरदस्त होती की त्या मंडळ अधिकाऱ्याला दवाखान्यात दाखल करावे लागले.

त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून तालुक्यातल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला. राजकीय हस्तक्षेप झाला आणि कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. यासंबंधी महसूल अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. मंडळाधिकारी फटकावला काय आणि अगदी मारुन टाकला काय याचं कसलही सोयरसुतक महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडलेले नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते थेट संगमनेर पर्यंत वाळू तस्करी काय प्रकार आहे हे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे राज्याला देखील परिचित आहे. विधानसभेत यावर अनेक वेळा चर्चा घडल्या आहेत. प्रश्न उपस्थित झाले आहेत. सगळे उद्योग चव्हाट्यावर आले आहेत.
संगमनेर यात अग्रेसर असल्याचे नेहमीच आढळून आले. कुठलीही कारवाई होत नसल्याने वाळू तस्करीचे धागेदोरे थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेले असल्याचे आरोप आता होत आहेत. एकंदरीत या सर्व बाबी पाहता संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.

महसूल विभागावर गौण खनिज तस्करी आणि वाळू तस्करी करणाऱ्या गुंडांचा, त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय पुढार्यांचा जास्त दबाव असल्याचे दिसते. संगमनेर सह जिल्हाधिकार्यालयातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी हतबल झाले असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
नेहमीप्रमाणे महसूलमंत्री यावर मौन बाळगून आहेत. त्यामुळे हे सर्व संशयित प्रकार आता नागरिकांना नेहमीचे झाले आहेत. मंडळ अधिकाऱ्याला मारहाण करणारी मंडळी कोण आहे हे सर्व माहित असून देखील कुठलीही कारवाई होत नाही. यातच सर्व आले. सदर वाळू तस्करी करणारा आणि तस्करी करणारा डंपर एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या नातेवाईकाच्या शेतात गौण खनिज आणि वाळू तस्करी करत असल्याची माहिती समजली आहे.

त्यामुळे ठेकेदार, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, वाळू तस्कर, महसूल अधिकारी यांची ‘नामी आघाडी’ या तालुक्यात झालेली दिसून येते.
वाळू आणि गौण खनिजांच्या तस्करी यामुळे संगमनेर तालुक्यातील पर्यावरणावर परिणाम होत आहे. नदी पात्रांमधील वाळूचे प्रमाण कमी होत असल्याने जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दगड, मुरूम, माती मोठ्या प्रमाणात उपसली जात असल्याने नैसर्गिक खनिज संपत्तीची हानी होत आहे. प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना याचे काही घेणे-देणे उरलेले नाही.
