मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला !

प्रतिनिधी —
संगमनेर शहर पोलिसांनी आज मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना शहर पोलिस ठाण्यात चहापानासाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक सर्वांना ताब्यात घेऊन त्यांना विनाअटक स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न न्यायसंस्थेने हाणून पाडला असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तुरूगात ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष शरद गोर्डे यांनी दिली आहे.

गोर्डे यांनी सांगितले की, आज संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना चर्चेला पोलिस ठाण्यात बोलावले. त्यावेळी दुपारचे बारा वाजून गेले होते. चहापान आणि चर्चा सुरू असताना अचानक संगमनेर मध्ये असलेल्या स्ट्राइक फोर्सला बोलावून कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना अटक दाखवून पोलीस व्हॅन मधून थेट न्यायालयात नेले. यावेळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपले मत मांडण्याचे किंवा काय कारवाई केली जाते आहे याची माहिती देखील देण्यात आली नसल्याचे गोर्डे यांचे म्हणणे आहे.

सीआरपीसी कलम 151 (3) प्रमाणे विनाअटक स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न संगमनेर पोलिसांनी न्यायालयात केला. मात्र न्यायालयाने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची ही मागणी फेटाळून लावत सर्व पदाधिकाऱ्यांना मुक्त केले आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलिसांची बाजू मांडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ॲड. श्रीराम गणपुले यांनी बाजू मांडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यां विरुद्ध धोकेबाजी करून केलेली कारवाई कोर्टाने रद्द केली असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे यांनी सांगितले आहे.
शरद गोर्डे यांच्या सह अशोक शिंदे (तालुका अध्यक्ष) तुषार ठाकूर (शहर अध्यक्ष) रामा शिंदे, संकेत लोंढे, संदीप आव्हाड, प्रमोद काळे, दर्शन वाकचौरे, अविनाश भोर, अभिजित कुलकर्णी, दिलीप ढेरंगे या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला.
