पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला भीषण आग !
महामार्गावर गाडी जळण्याची दुसरी घटना !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळ शिवारात असलेल्या बिकानेर ढाब्या समोर मालवाहू ट्रकला भिषण आग लागल्याची घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.
या महामार्गावर अपघात न होता अचानक ट्रक पेटण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो याच महामार्गावर जळून खाक झाला होता.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वाहनांचे स्पेअर पार्ट घेऊन जाणारा मालवाहू ट्रक हा पुणे येथून नाशिककडे जात होता. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळ शिवारातील बिकानेर ढाब्यासमोर आला असता ट्रकने पेट घेतला. चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने लगेच ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला. पण काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले होते.

घटनेची माहिती समजताच घारगाव व महामार्ग पोलीसांसह टोलनाक्याच्याही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीसांनी नाशिककडे जाणारी वाहतूक दुसर्या मार्गाने सुरू केली होती.
त्यानंतर ट्रक पेटल्याची माहिती समजताच संगमनेर नगरपालिका व थोरात साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे काही वेळात ही आग विझवण्यात आली. मात्र अग्निशमन बंबातील पाणी संपल्याने थोडीफार आग सुरूच राहिली. त्यामुळे पुन्हा अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. या आगीत ट्रक मोठ्याप्रमाणात जळून गेला. आग कशामुळे लागली ते मात्र समजू शकले नाही.

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच अशाच पद्धतीने प्रश्नपत्रिका घेवून जाणाऱ्या टेंपोला चंदनापुरी घाटात भिषण आग लागली होती.
