आईच्या मृत्यूला आडवी आली मुलगी !

आर्या नवलेला  वीरश्री पुरस्कार !

प्रतिनिधी —

आईचा मृत्यू आणि जीवन यात काही सेकंदाचे अंतर राहिले होते. परंतु बारावर्षीय चिमुरड्या लेकीने मोठे प्रसंगावधान व अनोखे धाडस दाखवत सर्वशक्तीनिशी जीपच्या चाकाखाली पडलेल्या आपल्या आईला मागे ओढले. त्यामुळे जीवावर आलेले संकट केवळ एका हातावर निभावले आणि जीवघेण्या अपघातातून आई बचावली. मोठ्या हिमतीने आपल्या आईचे प्राण वाचवणाऱ्या त्या मुलीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ती शिकत असलेल्या स्ट्रॉबेरी शाळेने तिला वीरश्री पुरस्कार बहाल केला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या जिवाचा थरकाप उडवणारी ही घटना संगमनेर शहरात घडली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आर्या सुनील नवले (वय १२)असे त्या धाडसी मुलीचे नाव आहे. रात्रभर तापाने फणफणलेल्या आर्याला घेऊन तिची आई मनिषा दवाखान्यात चालली होती. त्यांची दुचाकी अकोले नाक्याकडे येत असताना समोरून चुकीच्या दिशेने एक महिला दुचाकीवर आली. त्याच वेळी मागून आलेल्या जीप चालकाने जीप रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. दोन वाहनांच्या मध्ये सापडलेली स्कुटी थांबविण्याच्या प्रयत्नात मनिषा नवले व आर्या दोघीही जिपचा धक्का लागून खाली पडल्या.

मनीषा या जिपच्या मागच्या चाकाच्या काही फूट पुढे पडलेल्या होत्या. काही सेकंदात त्यांच्या अंगावरुन जीपचे मागील चाक जाण्याची वेळ आली होती. बाजूला पडलेल्या आर्याने समोरील दृश्य पाहिले आणि ती गर्भगळीत झाली. स्वतःच्या जखमा आणि तापाने फणफणलेले शरीर विसरून मोठ्या धाडसाने तिने आईच्या एका हाताला धरून मागे खेचले. आर्याच्या या प्रसंगावधानाने प्राण वाचले परंतु आईचा उजवा हात मात्र चाकाखाली सापडला. यात हाताच्या पंजाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘जीवावर आले ते हातावर निभावले’ असेच या प्रसंगाचे वर्णन करावे लागेल. आर्याने दाखवलेल्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ती शिकत असलेल्या स्ट्रॉबेरी शाळेच्या संस्थापिका संज्योत वैद्य आणि प्राचार्य रमेश दिघे यांनी तिला या वर्षीचा विरश्री पुरस्कार जाहीर केला.

माझ्या समोरच हा अपघात झाला समोरचे दृश्य पाहून मी घाबरून गेले होते परंतु त्या मुलीने खूप चपळाईने आईला टायर खालून बाहेर ओढले मुलींमुळेच आईचे प्राण वाचले

वैशाली बर्गे, प्रत्यक्षदर्शी

RRAJA VARAT

One thought on “आईच्या मृत्यूला आडवी आली मुलगी !”
  1. राष्ट्रपती कडून सत्कार केला पाहिजे व पंतप्रधान ब्रेव्हरी अवार्डसाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयात हे वृत्त पाठवले पाहिजे संगमनेर टाईम्सने पुढाकार घेतला पाहिजे.
    आर्याचं मनापासून अभिनंदन. तिची आईची तब्येत आता कशी आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!